DRILLING FACT: बीड जिल्ह्यात 1200 फूट खोल बोअर खोदल्यामुळे लाव्हारस बाहेर आला का?

False सामाजिक

बीडमध्ये अलिकडे कथितरित्या लाव्हारस/ज्वालामुखी निघण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. गेल्या महिन्यात शिरसाळा येथे जमिनीतून लावा बाहेर पडत असल्याचा व्हिडियो व्हायरल झाला होता. तो दावा खोटा असल्याचे फॅक्ट क्रेसेंडोने सिद्ध केले. आता आणखी एक व्हिडियो सोशल मीडियावर फिरवला जात आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात बोअरवेल खोदणाऱ्या एका ट्रकला जमिनीतून बाहेर पडणाऱ्या लावारसामुळे आग लागली, असा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमध्ये लिहिले की, बीड जिल्ह्यात 1200 फूट बोर खोदल्यामूळे लाव्हारस बाहेर येऊ लागला आहे. शिरसळ येथे जमिनीतून लाव्हा निघत आहे. जल पुनर्भरण, जमीनीतल पाण्याची पातळी वाढवण्यासाठी जर प्रयत्न नाही केले तर मानवजातीचा विनाश अटळ आहे. गेल्या दीड-दोन हजार वर्षात महाराष्ट्र लाव्हारस निघण्याचे हे पहिलेच उदाहरण असावे. ते ही मानवाच्या चुकीमुळे.

हा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरत आहे.

काय आहे व्हिडियोमध्ये

2.12 मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये एका मोकळ्या मैदानात बोअरवेल खोदणाऱ्या ट्रकला आगलेली दिसते. खोदकाम सुरू असलेल्या बोअरमधून आगीचे लोट बाहेर येत असून, काही लोक ही आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहेत. खूप प्रयत्न करूनही आग काही आटोक्यात येत नाही. पोस्टमधील दाव्यानुसार बीड जिल्ह्यात ही घटना घडली. पाण्याची पातळी प्रचंड खालावली असून 1200 फुट खोल बोअर घेतले जात आहेत. त्यामुळे जमिनीतील लाव्हारस बाहेर पडत आहे. या पोस्टला खरे मानून अनेक चिंता आणि भीती व्यक्त करीत आहेत.

तथ्य पडताळणी

हा व्हिडियो बीडमध्ये असल्याचा काही पुरावा किंवा उल्लेख नाही. तसेच आग विझवणारे लोक मराठीदेखील बोलत नाहीत. आम्ही बीड येथील अग्निशमन विभागाशी यासंदर्भात संपर्क साधला. त्यांनी अशी कोणतीही घटना घडली नाही, असे सांगितले. त्यामुळे या व्हिडियोच्या सत्यतेविषयी शंका घेण्यास वाव आहे.

युट्यूबवर विविध कीवर्डसने शोध घेतला असता एक व्हिडियो आढळला. यामध्ये हा व्हिडियो पश्चिम आफ्रिकेतील माली देशातील असल्याचे म्हटले आहे.

व्हिडियोचा फ्रेम बाय फ्रेम अभ्यास व बारकाईने विश्लेषण केल्यावर एक सुगावा हाती लागला. व्हिडियोमध्ये दिसणाऱ्या ट्रकवर पांढऱ्या अक्षरात काही तरी लिहिलेले आहे. फ्रेम कॅप्चर करून पाहिले असता ट्रकवर FORAGE SARL असे लिहिलेले आहे. तसेच सोबत संपर्कासाठी फोन क्रमांकदेखील दिलेला आहे. या क्रमांकाची सुरूवात +223 ने होते. या माहितीच्या आधारावर गुगलवर शोध घेतला.

+223 हा आफ्रिकेतील माली या देशाचा टेलिफोन कोड आहे. भारताचा +91 आहे. तसेच गुगलवर FORAGE SARL असे सर्च केले असता आफ्रिकेत कार्यरत असणाऱ्या अनेक खोदकाम (Drilling) करणाऱ्या कंपन्या समोर आल्या. पैकी Forage FTE Drilling या कंपनीचे कार्यालय माली देशाची राजधानी बामाको येथे आहे. कंपनीचा संपर्क क्रमांकदेखील +223 ने सुरू होतो. तसेच वरील स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही MALI असे लिहिलेले पाहू शकता.

माली या देशाचे अधिकृत नाव रिपब्लिकन ऑफ माली असे आहे. पश्चिम आफ्रिका विभागात हा देश येतो. माली देशाची राजभाषा फ्रेंच आहे, परंतु, नागरिक मोठ्या प्रमाणात बाम्बारा ही भाषा बोलतात. फ्रेंच भाषेत FORAGE या शब्दाचा अर्थ खोदकाम (Drilling) असा होतो.

जर ही घटना महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील असेल तर, आफ्रिकेतील बोअरवेल ट्रक येथे कसा येऊ शकतो? किंवा भारतातील ट्रकवर माली देशातील टेलिफोन क्रमांक का देतील? यावरून हे स्पष्ट होते की, हा व्हिडियो बीडमधील नसून आफ्रिका खंडातील माली देशातील असावा.

मग लाव्हारसामुळे लागलेल्या आगीचे काय?

जमिनीमध्ये अनेक प्रकारचे हायड्रोकार्बन (जीवाश्म इंधन) असतात. यामध्ये प्रामुख्याने मिथेन आणि नैसर्गिक वायूचा समावेश असतो. खोदकाम करताना घ्यावयाच्या काळजीसंदर्भात वॉटरवेल जर्नलमधील एका लेखात याची माहिती दिली आहे. खोलवर खोदकाम करताना जमिनीतील नैसर्गिक वायू किंवा मिथेनचा साठा लागू शकतो. हा वायू ज्वलनशील असतो.

मूळ लेख येथे वाचा – वॉटरवेल जर्नलअर्काइव्ह

दोन वर्षांपूर्वी नेपाळमधील सिरुटार येथेदेखील बोअरवेल घेताना जमिनीतील नैसर्गिक वायूसाठ्याला धक्का लागून आग लागली होती. ज्वलनशील वायूने पेट घेतल्याने जमिनीतून आगीचे लोट निघू लागले होते. या घटनेचा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता. सध्या व्हायरल असलेल्या व्हिडियोप्रमाणेच यामध्ये बोअरवेल ट्रकला आग लागलेली आहे.

याविषयीची बातमी येथे वाचा – द हिमालयन टाईम्सअर्काइव्ह

राजस्थानमधील कोटा येथेदेखील अशीच घटना घडली होती. झी हिंदुस्थान चॅनेलने याची बातमी केली होती. ती तुम्ही खाली पाहू शकता.

म्हणजेच जमिनीतील ज्वलनशील नैसर्गिक वायूमुळे बोअरवेलला आग लागू शकते.

लाव्हारस निघेपर्यंत बोअर खोदला जाऊ शकतो का?

आतापर्यंत केवळ तीन वेळेसच खोदकाम करताना लाव्हारस लागला आहे. आईसलँड येथे 2009 साली डीप ड्रीलिंग प्रोजेक्टअंतर्गत वैज्ञानिक जमिनीत खोलवर खोदकाम करत असताना 6900 फुटांवर लाव्हा लागला होता. त्यापूर्वी हवाई बेटावर 1977 आणि 2005 साली अशी घटना घडली होती. हवाई किंवा आईसलँड हे सक्रीय ज्वालामुखी प्रदेश आहेत. त्यामुळे तेथे असे घडण्याची शक्यता आहे. परंतु, बीडबद्दल तसे म्हणता येणार नाही. केवळ 1200 फुटांवर लाव्हारस असण्याचा प्रश्नच नाही.

मूळ बातमी येथे वाचा – Phys.Org

निष्कर्ष

व्हायरल होत असलेला व्हिडियो बीड जिल्ह्यातील नसून माली देशातील आहे. तसेच ट्रकला लाव्हारसामुळे नाही तर जमिनीतील ज्वलनशील वायूमुळे आग लागली असावी. बीड अग्निशमन विभागाने हा व्हिडियो बीड जिल्ह्यामधील नसल्याचे स्पष्ट केले असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य ठरते.

Avatar

Title:DRILLING FACT: बीड जिल्ह्यात 1200 फूट खोल बोअर खोदल्यामुळे लाव्हारस बाहेर आला का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False