FACT CHECK : नरेंद्र मोदी यांनी विक्रम लँडरची पाहणी केल्यानंतर बाहेर पडताना ड्रेस बदलला होता का?

False राजकीय

सात सप्टेंबर रोजी रात्री दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे अपेक्षित होते. यावेळी बंगळुरू येथील इस्रोच्या मिशन ऑपरेशन कॉम्पलेक्स पंतप्रधान नरेंद्र मोदी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित होते. परंतु, अवघ्या काही मीटर अंतर राहिलेले असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटला.

यामुळे हताश झालेल्या इस्रोच्या प्रमुखांना मोदींनी मारलेली मिठी बरीच गाजली. यावरून अनेक उलटसुलट दावे आणि टीका करण्यात येत आहे. त्यापैकी एक म्हणजे मोदी इस्रो कार्यालयात आले तेव्हा त्यांनी काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते. मात्र, के. सिवन यांना मिठी मारली तेव्हा त्यांच्या अंगात बदामी रंगाचे जॅकेट होते. याचा अर्थ की, मोदींनी इस्रो कार्यालयातच कपडे बदलले. यामागे अनेक तर्कवितर्क देऊन विविध दावे केले जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये दोन फोटोंची तुलना केली आहे. पहिल्या फोटोत मोदी विक्रम लँडरची पाहणी करताना दिसतात. यावेळी त्यांच्या अंगात काळ्या रंगाचे जॅकेट आहे. दुसऱ्या फोटोत के. सिवन यांना मिठी मारलेली आहे. यामध्ये त्यांच्या अंगात वेगळ्या रंगाचे जॅकेट आहे. युजरने लिहिले की, इस्रोत आत असताना वेगळा ड्रेस आणि बाहेर पडताना वेगळा. तिथे पण ड्रेस घेऊन गेले होते काय!

तथ्य पडताळणी

चांद्रयान-2 मोहिमेंतर्गत विक्रम लँडर 7 सप्टेंबर रोजी रात्री दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते. संपूर्ण जगाचे यावेळी इस्रोच्या कामगीरीकडे लक्ष होते. या ऐतिहासिक क्षणाचे विविध वृत्तवाहिन्या व सोशल मीडिया व्यासपीठांवरून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. दूरदर्शनने इस्रोच्या कार्यालयातून हे मिशन लाईव्ह दाखविले होते. दूरदर्शनच्या फेसबुक पेजवर तुम्ही ते पाहू शकता. तसे एनटीडीव्हीने केलेल्या लाईव्ह प्रक्षेपणाचा व्हिडियो खाली पाहू शकता.

विक्रम लँडर चंद्रावर उतरताना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी बंगळुरू येथील इस्रोच्या कार्यालयात उपस्थित होते. यावेळी त्यांच्या अंगात काळे जॅकेट दिसते. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याची अधिकृत घोषणा रात्री सुमारे पावणे दोन वाजता केली होती. त्यानंतर पंतप्रधानांनी संपूर्ण वैज्ञानिकांना धीर देत हिंमत न हरण्याचा सल्ला दिला. तसेच तेथे उपस्थित तरुण मुलांशीदेखील त्यांनी संवाद साधला. 

वरील व्हिडियोमध्ये तुम्ही 1 तास 46 व्या मिनिटांपासून पाहू शकता की, पंतप्रधान मोदी इस्रोच्या इमारतीतून बाहेर पडले आहेत. त्यांच्या मागे के. सिवन येतात. येथे मोदी त्यांना पुन्हा धीर न सोडण्यास सांगत भेट घेतात. मग ते गाडीमध्ये बसून रात्री अडीचच्या सुमारास निघून जातात. खाली दिलेल्या फोटोमध्ये तुम्ही हा घटनाक्रम पाहू शकता.

फोटो क्र. 1 – इस्रोच्या कार्यालयाबाहेर मोदी यांनी के. सिवन यांची भेट घेतली.

फोटो क्र. 2 – मोदी त्यांची रजा घेऊन परत निघाले.

फोटो क्र. 3 – मोदी गाडीत बसून निघून गेले.

या सर्व फोटोंमध्ये त्यांनी काळे जॅकेट घातलेले आहे. याचा अर्थ की, सात सप्टेंबरच्या रात्री विक्रम लँडरची पाहणी करण्यासाठी आलेल्या मोदींनी संपर्क तुटल्याचे कळाल्यानंतर वैज्ञानिकांना भेटून तेथून निघून गेले होते. येथे त्यांनी जॅकेट बदलले नव्हते.

मग त्यांच्या अंगात बदामी रंगाचे जॅकेट कसे आले?

नरेंद्र मोदी यांनी 7 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता ट्विट करून सांगितले होते की, बंगळुरू येथील इस्रो सेंटरमध्ये सकाळी आठ वाजता मी वैज्ञानिकांना संबोधून भाषण करणार आहे.

त्यानुसार, नरेंद्र मोदी सकाळी इस्रोच्या कार्यालयात पुन्हा पोहचले. दूरदर्शनच्या युट्यूब चॅनेलवर ते इस्रो सेंटरमध्ये आल्याचा व्हिडियो उपलब्ध आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता. यामध्ये तुम्ही स्पष्ट पाहू शकता की, मोदींनी बदामी रंगाचे जॅकेट घातले आहे. म्हणजे रात्री इस्रोतून निघून गेल्यानंतर मोदी सकाळी परत आले होते. 

इस्रो सेंटरमध्ये भाषण केल्यानंतर मोदी तेथून पुन्हा बाहेर पडले. यावेळी के. सिवन यांना मिठी मारली होती. त्यामुळे पोस्टमधील दुसऱ्या फोटोत मोदींच्या अंगात बदामी रंगाचे जॅकेट आहे.

निष्कर्ष

विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याची मोहीम पाहण्यासाठी नरेंद्र मोदी रात्री दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान इस्रो सेंटरमध्ये उपस्थित होते. तेथून अडीच वाजता ते निघून गेले. यावेळी त्यांच्या अंगात काळे जॅकेट होते. मग सकाळी आठच्या सुमारास मोदी पुन्हा इस्रो सेंटरमध्ये आले. भाषण केल्यानंतर त्यांनी के. सिवन यांना मिठी मारली. यावेळी त्यांच्या अंगात बदामी रंगाचे जॅकेट होते. याचा अर्थ की, पोस्टमधील दोन्ही फोटो वेगवेगळ्या वेळी घेतलेले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी विक्रम लँडरची पाहणी केल्यानंतर बाहेर पडताना ड्रेस बदलण्याचा दावा खोटा आहे.

Avatar

Title:FACT CHECK : नरेंद्र मोदी यांनी विक्रम लँडरची पाहणी केल्यानंतर बाहेर पडताना ड्रेस बदलला होता का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False