Fact Check : इलेक्ट्रिक बस डिझेलच्या सहाय्याने चार्ज केल्या जात आहेत का?

False राजकीय सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

पुण्यात इलेक्ट्रिक बस डिझेलच्या सहाय्याने चार्ज केल्या जात आहेत, अशी माहिती देत Charudatta Ghatge यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. #पुणे_स्मार्ट_सिटीची_गंम्मत : इलेक्ट्रिक बस डिझेल जनरेटरच्या साहाय्याने चार्जिंग करताना असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. इलेक्ट्रिक बस खरोखरच डिझेलच्या सहाय्याने चार्ज केल्या जात आहेत का याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. 

फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive

पीएमपीएमएलच्या या बस जनरेटर आणि डिझेलचा वापर करत चार्ज करण्यात येत असल्याचा दावा वेगवेगळ्या फेसबुक पोस्टमध्येही करण्यात आल्याचे दिसत आहे.

तथ्य पडताळणी 

पुण्यात इलेक्ट्रिक बससेवा सुरु आहे का, हे आम्ही सर्वप्रथम जाणून घेतले. तेव्हा 9 फेब्रुवारी 2019 रोजी अशी बससेवा पुण्यात सुरु झाल्याचे आम्हाला दिसून आले. द टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत दिलेले वृत्त आपण खाली पाहू शकता.

द टाईम्स ऑफ इंडिया / Archive

इलेक्ट्रिक बसच्या या संख्येत वेळोवेळी वाढ करण्यात आल्याचेही दिसून येत आहे. इलेक्ट्रिक बस डिझेलच्या जनरेटरद्वारे चार्ज करण्यात आल्याचे वृत्तही आम्हाला दिसून आले.

News18.com / Archive

पीएमपीएमएलच्या संकेतस्थळावर याबाबत काही माहिती मिळते का हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला अशी कोणतीही माहिती दिसून आली नाही. त्यानंतर आम्हाला पीएमपीएमएलचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांचे एक ट्विट दिसून आले. या ट्विटद्वारे त्यांनी माहिती दिली आहे की, या बस हैदराबादहून पुण्याला आणण्यात आल्या आहेत. हे अंतर जास्त असल्याने आणि या बस एकदा चार्ज केल्यावर 250 किलोमीटर अंतर धावतात. हैदराबाद-पुणे मार्गावर कुठेही चार्जिंग स्टेशन नसल्याने सोलापूर येथे या बस डिझेल जनरेटरच्या सहाय्याने चार्ज करण्यात आल्या. पीएमपीएमएलची प्रत्येक बस ही थेट वीजपुरवठ्याद्वारेच चार्ज करण्यात येते. त्यासाठी डिझेल जनरेटरचा वापर करण्यात येत नाही.

पीएमपीएमएलचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी याबाबत केलेले ट्विटस आपण खाली पाहू शकता :  

निष्कर्ष 

पुण्यातील पीएमपीएमएल बससेवेच्या इलेक्ट्रिक बस या डिझेल जनरेटरच्या सहाय्याने चार्ज करण्यात येत नाहीत. या थेट वीजपुरवठ्याद्वारे चार्ज करण्यात येतात. त्या हैदराबादहून पुण्याला आणण्यात येत असताना सोलापूर येथे डिझेल जनरेटरच्या सहाय्याने चार्ज करण्यात आल्या होत्या. त्याचा व्हिडिओ आता असत्य माहितीसह पसरविण्यात येत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : इलेक्ट्रिक बस डिझेलच्या सहाय्याने चार्ज केल्या जात आहेत का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •