एकनाथ शिंदे यांनी ‘महाशक्ती मला मोठ्या बाजार समित्या देणार’ असे विधान केले नाही; वाचा सत्य

False राजकीय

राज्यात 147 पैकी 76 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला असून शिंदे आणि भाजप यांच्या महाशक्ती गटाने 31 समित्यांवर विजय मिळवला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने एक विधान व्हायरल होत आहे.

सरकारनामा या वेबसाईटचे ग्राफिककार्ड वापरून दावा केला जात आहे की, एकनाथ शिंदे यांनी महाशक्तीने त्यांना “आता पेक्षा मोठ्या बाजार समित्या देणार” असल्याचे म्हटले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणअंती कळाले की, हे बनावट ग्राफिक आहे. एकनाथ शिंदे यांनी असे कोणतेही विधान केलेले नसून, सरकारनामा वेबसाईटनेसुद्धा अशी बातमी दिलेली नाही.

काय आहे दावा ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि सरकारनामा वेबसाईटचा लोगो असणाऱ्या व्हायरल ग्राफिकमध्ये लिहिलेले आहे की, “आता पेक्षा मोठ्या बाजार समित्या ते आपल्या देणार असल्याचे सांगितल – एकनाथ शिंदे”

मुळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

मुख्यमंत्र्यांनी असे विधान केले असते तर नक्कीच मोठी बातमी झाली असती. परंतु, अशी कोणतीही बातमी कुठेच आढळली नाही.

तसेच सरकारनामा वेबसाईटवर आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील हे ग्राफिक आढळले नाही.

या उलट सरकारनामा वेबसाईटवर असणारे ग्राफिक कार्ड आणि व्हायरल ग्राफिक कार्डमध्ये फरक आढळला.

पुढे फॅक्ट क्रेसेंडोने सरकारनामाच्या सोशल मीडिया प्रमुख समृद्धा भांबुरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी व्हायरल ग्राफिक बनावट असल्याचे सांगितले. सरकारनामाने अशी कोणतीही बातमी दिली नाही.

वरील ग्राफिक आणि व्हायरल ग्राफिक यांची तुलना केल्यावर आपल्या लक्षात येईल की, सरकारनामाद्वारे वापरला जाणारा फाँट वेगळा आहे. तसेच मूळ डिझाईनमध्ये काळ्या रंगात विधान आणि लाल रंगामध्ये नाव लिहिले जाते. परंतु, व्हायरल ग्राफिकमध्ये सर्वच मजकूर लाल रंगामध्येच लिहिलेला आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, सरकारनामाचा लोगो लावून व फेक ग्राफिक तयार करून एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनावट विधान व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:एकनाथ शिंदे यांनी ‘महाशक्ती मला मोठ्या बाजार समित्या देणार’ असे विधान केले नाही; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False