
जगभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 19 लाखाच्यावर गेलेली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे एक लाख 19 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनच्या राणी एलिजाबेथ यांचे पुत्र आणि वारसदार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांनी आयुर्वेदिक उपचारांनी कोरोनावर मात केल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

तथ्य पडताळणी
प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाली का, ते आयुर्वेदिक उपचारांनी बरे झाले का? याचा आम्ही शोध घेतला. त्यावेळी आयएएनएस या वृत्तसंस्थेने 2 एप्रिल 2020 रोजी केलेले एक ट्विट दिसून आले. या ट्विटमध्ये आयुर्वेदिक उपचार केल्याने ते ठणठणीत बरे झाल्याचा दावा केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केल्याचे म्हटले आहे.
त्यानंतर द इंडियन एक्स्प्रेसने 4 एप्रिल 2020 रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तात प्रिन्स चार्ल्स यांच्या कार्यालयाने ते आयुर्वेदिक उपचारांद्वारे कोरोनामुक्त झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केल्याचे म्हटले आहे. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनीही याबाबत खुलासा करताना हा दावा आपला नसून बंगळुरु येथील एका संस्थेने केला असल्याचे म्हटलं आहे. द वीक, डेक्कन हेरॉल्ड यांनी देखील याबाबत वृत्त दिले आहे.

द इंडियन एक्स्प्रेसने दिलेले सविस्तर वृत्त / Archive
यातून स्पष्ट झाले की, प्रिन्स चार्ल्स यांच्यावर आयुर्वेदिक उपचार करण्यात आल्याचा दावा त्यांच्या कार्यालयाने फेटाळला आहे. आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
निष्कर्ष
प्रिन्स चार्ल्स यांच्यावर आयुर्वेदिक उपचार करण्यात आल्याचा त्यांच्या कार्यालयाने इन्कार केला आहे. ते आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी औषधांनी कोरोनामुक्त झाल्याचा दावा त्यामुळे असत्य ठरतो.

Title:प्रिन्स चार्ल्स यांनी आयुर्वेदिक उपचारांनी कोरोनावर मात केली का? वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
