FACT-CHECK: पाण्यातून कोरोना विषाणू पसरू शकतो का? वाचा सत्य काय आहे

Coronavirus False

कोरोना व्हायरसमुळे जगात एक लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. चीनमधून उगम पावलेला हा विषाणू नेमका पसरतो कसा याविषयी अनेक गैरसमज समाजमाध्यमांत प्रचलित आहेत. असाच एक दावा म्हणजे ‘पाण्यातून कोरोना विषाणू पसरतो’ हा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याची पडताळणी करण्याची विनंती केली.

तथ्य पडताळणी

लॉकडाऊन असताना काही तरुण विहिरीवर पोहायला गेले होते. त्यांना पोलिसांनी चोप देत समज दिली. या घटनेचा व्हिडियो शेयर करून युजर्सने म्हटले की, सरकारने गप घरात बसायला लावलं तर घरात बसेना हे लोक पोहायला गेल्यावर पोलीस आले. मंग काय पोलिसांनी चांगलाच समाचार घेतला पुढचा व्हिडिओ तुम्हीच बघा मित्रानो. पाण्यातूनसुद्धा कोरोना व्हायरस जास्त पसरू शकतो. त्यामुळे पोहणे बी बंद ठेवा काही दिवस सरकारला सहकार्य करा.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

पाण्यातून कोरोना विषाणू पसरतो का याबाबत शोध घेतला असता ही माहिती चुकीची असल्याचे कळाले. अमेरिका सरकारची अधिकृत संस्था सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) वेबसाईटवर कोरोनाविषयी माहिती दिलेली आहे. पाण्याचे दोन प्रकार आहे. एक म्हणजे पिण्याचे पाणी आणि दुसरे म्हणजे सांडपाणी. या दोन्हींमधून कोरोना पसरत असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे ‘सीडीसी’ने म्हटले आहे.

पिण्याच्या पाण्यातून कोरोना विषाणू पसरू शकतो का?

कोविड-19 या महारोगाला कारणीभूत असणारा कोरोना विषाणू पिण्याच्या पाण्यात अद्याप आढळलेला नाही. शहर पालिकांद्वारे पिण्याच्या पाण्यावर करण्यात येणाऱ्या शुद्धीकरण प्रक्रियेमुळे हा विषाणू त्यात राहत नाही किंवा निष्क्रिय होतात. त्यामुळे पिण्याचा पाण्यातून कोरोना पसरत नाही, असे ‘सीडीसी’ म्हणते.

अमेरिकेतील पर्यावरण सुरक्षा संस्थेनेदेखील (EPA) पिण्याचे पाणी एकदम सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. 

CDC-1.png

मूळ माहिती येथे वाचा – CDC

मग सांडपाण्यातून कोरोना विषाणू पसरतो का?

‘सीडीसी’च्या मते, आतापर्यंत गोळा केलेली माहिती आणि संशोधनानुसार सांडपाण्यातून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता अत्यंत नगण्य आहे. कारण आतापर्यंत सांडपाण्यातून कोरोना पसरल्याचा कोणताही पुरावा किंवा घटना समोर आलेली नाही. त्यामुळे स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे.

CDC-2.png

मूळ माहिती येथे वाचा – CDC

निष्कर्ष

पाण्यातून कोरोना पसरत असल्याची कोणतेही पुरावे अद्याप आढळलेले नाही. पाण्यावर केल्या जाणाऱ्या शुद्धीकरण प्रक्रियेमुळे विषाणूचा प्रसार होण्याचा धोका नसल्याचे ‘सीडीसी’ने म्हटले आहे. यावरून स्पष्ट होते की, पाण्यातून कोरोना पसरण्याची भीती पसरविणे चुकीचे आहे. कोविड-19 महारोगाच्या जागतिक साथीदरम्यान असत्यापीत माहिती पसरवू नये.

Avatar

Title:FACT-CHECK: पाण्यातून कोरोना विषाणू पसरू शकतो का? वाचा सत्य काय आहे

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False