FAKE: डोंगरी येथील इमारत कोसळण्याचा व्हिडियो 6 वर्षांपूर्वीचा आहे. त्यावर विश्वास ठेवू नका.

False सामाजिक

मंगळवारी मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळल्याची घटना घडली. येथील तांडेल क्रॉस लेनमधील 25-बी, केसरभाई नावाची ही इमारत कोसळून आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून, 9 जण जखमी झाले आहेत. ही इमारत कोसळण्याचा लाईव्ह व्हिडियो म्हणून सध्या एक क्लिप झपाट्यात पसरविली जात आहे. 30 सेंकदाच्या या क्लिपमध्ये एक इमारत कोसळताना दिसते. ही डोंगरीतील केसरभाई इमारत असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या क्लिपची तथ्य पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

व्हायरल होत असलेल्या व्हिडियोतील की-फ्रेम्स निवडून गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर विविध रिझल्ट समोर आले. सदरील व्हिडियो गेल्या काही वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे दिसून येते. तसेच या व्हिडियोविषयी विविध दावेदेखील करण्यात आलेले आहेत. काही वेबसाईटवर हा व्हिडियो 2017 साली कोसळलेल्या भेंडी बाजार येथील इमारतीचा म्हणून शेयर करण्यात आला आहे तर, कोणी हा व्हिडियो वेंदे बाझार येथील इमारतीचा म्हटले आहे. दोन्ही व्हिडियो 1 सप्टेंबर 2017 रोजीचे आहेत.

युट्यूबवर हे दोन्ही व्हिडियो येथे आणि येथे पाहू शकता.

रिव्हर्स इमेज सर्च मधून आणखी एक व्हिडियो आढळला. टीव्ही-9 गुजराती चॅनेलने तो डेलीमोशन वेबसाईटवर 21 सप्टेंबर 2013 रोजी शेयर केला होता. सोबत दिलेल्या माहितीनुसार, 6 वर्षांपूर्वी मुंबईतील मुंब्रा येथे एक इमारत कोसळली होती. या इमारतीमध्ये 42 कुटुंब राहायाची. विशेष म्हणजे ही इमारत केवळ 15 वर्षे जुनी होती. डोंगरी म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडियो आणि हा सहा वर्षांपूर्वीचा व्हिडियो सारखाच आहे.

मूळ व्हिडियो येथे पाहा – डेलीमोशन

हा धागा पकडून शोध घेतला असता मुंब्रा येथे 6 वर्षांपूर्वी झालेल्या या घटनेसंबंधी अनेक बातम्या आणि व्हिडियो आढळले. महाराष्ट्र टाईम्सच्या बातमीनुसार, मुंब्रा येथे 21 सप्टेंबर 2013 रोजी सकाळी स्टेशनपरिसरात असलेली एक चार मजली इमारत कोसळली होती. सकाळी सुमारे साडे आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. त्यानंतर आसपासच्या लोकांनी ढिगाऱ्या खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. डीएनएच्या बातमीनुसार, या इमारतीचे नाव द बानू कॉम्प्लेक्स होते. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

मूळ बातमी येथे वाचा – महाराष्ट्र टाईम्स

मुंब्राय येथील इमारत कोसळण्याचा व्हिडियो त्यावेळी अनेक वृत्तवाहिन्यांनी दाखविला होता. न्यूज-18 लोकमत नावाच्या चॅनेलने 21 सप्टेंबर 2013 रोजी युट्यूबवर हा व्हिडियो अपलोड केला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, सदरील व्हिडियो डोंगरी येथील इमारत कोसळण्याचा नाही. तो 6 वर्षांपूर्वी मुंब्रा येथील इमारत कोसळण्याचा आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:FAKE: डोंगरी येथील इमारत कोसळण्याचा व्हिडियो 6 वर्षांपूर्वीचा आहे. त्यावर विश्वास ठेवू नका.

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False