हा व्हिडियो ब्राझिलच्या अंडर-17 फुटबॉल टीमच्या 76 वर्षीय प्रशिक्षकाचा नाही. पाहा सत्य.

False आंतरराष्ट्रीय

ब्राझील म्हणजे फुटबॉलचे नंदवनच! ब्राझीलच्या नसानसांमध्ये फुटबॉल आहे, असे म्हणने अतिशयोक्ती ठरणार नाही. पेलेंच्या या देशात एकाहुन एक महान फुटबॉल खेळाडू जन्माले आले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या खेळासाठी वेडे आहेत. हे वेड दाखवणारा एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

काही तरुण मुले फुटबॉल खेळत असताना एक म्हातारा त्यांच्यामध्ये खेळायला येतो. सुरुवातीला थोडे अडखळल्यानंतर हा म्हातारा मग अशा काही चपळतेने बॉल तरण्याबांड पोरांसमोरून बॉल घेऊन जातो की, पाहणारे थक्क होऊन जातात. हा म्हातारा म्हणजे ब्राझीलच्या अंडर-17 फुटबॉल संघाचे 76 वर्षीय कोच अमॅड्यू कार्लोस आहेत, असा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सदरील व्हिडियोचे सत्य जाणून घेण्यासाठी त्यातील की-फ्रेम निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून पाच वर्षांपूर्वीचा युट्यूबवरील एक व्हिडियो समोर आला. शॉन गार्नियर नावाच्या एका फ्रीस्टाईल फुटबलपटुचा हा व्हिडियो आहे. 

या व्हिडियोच्या शेवटी तुम्ही पाहू शकता की, शॉनने मेकअप करून एका म्हाताऱ्याची वेशभुषा केली होती. त्यानंतर तो ब्राझीलमध्ये काही तरुणांच्या खेळात सहभागी झाली होता. हा केवळ प्रँक होता. व्हिडियोच्या शेवटी तुम्ही पाहू शकता की, शॉनने कसे मेकअप केले होते.

इंग्लंडच्या मेट्रो वेबसाईटने याबाबतीत बातमी केली होती. त्यात म्हटले की, शॉनने मेकअप करून म्हाताऱ्याचा वेशभुषा केली होती. हा सगळा व्हिडियो ठरवून केला होता. 

मूळ बातमी येथे वाचा – मेट्रो

मग कार्लोस अमाड्यू कोण आहेत?

कार्लोस अमाड्यू हे ब्राझीलच्या अंडर-17 फूटबॉल टीमचे 2018 मध्ये कोच होते. साऊथ अमेरिकन अंडर-17 चषक जिंकल्यानंतर ते अंडर-20 संघाचे मॅनेजर झाले होते. सध्या त्यांचे वय 54 वर्षे आहे.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होतो की, सदरील व्हिडियो ब्राझीलच्या अंडर-17 फुटबॉल टीमच्या 76 वर्षीय कोच कार्लोस आमाड्यू यांचा नाही. फ्रान्समधील फ्रीस्टाईल फुटबॉलर शॉन गार्नियर याने मेकअप करून म्हाताऱ्याचा वेश करून 2014 साली हा प्रँक व्हिडियो तयार केला होता. त्यामुळे सदरील पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:हा व्हिडियो ब्राझिलच्या अंडर-17 फुटबॉल टीमच्या 76 वर्षीय प्रशिक्षकाचा नाही. पाहा सत्य.

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False