
हाथरस पीडितेचे रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यावरून उत्तर प्रदेश पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर एका फोटोद्वारे दावा केला जात आहे की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस पीडितेच्या दाहसंस्कार लाईव्ह ऑनलाईन पाहिला होता.
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा फोटो एडिटेड असल्याचे कळाले. त्यामुळे हा दावा खोटा आहे.
काय आहे दावा?
व्हायरल पोस्टमध्ये योगी आदित्यनाथ लॅपटॉपवर हाथरस पीडितेचा दाहसंस्कार पाहत असल्याचा फोटो शेयर केलेला आहे.
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर लगेच कळाले की, हा फोटो बनावट आहे. ‘एएनआय’ न्यूज एजन्सीने 30 सप्टेंबर 2020 रोजी मूळ फोटो शेयर केला होता. त्यातील माहितीनुसार, योगी आदित्यनाथ हाथरस पीडितेच्या कुटुंबियांशी संवाद साधत असतानाचा हा फोटो आहे.
झी न्यूजच्या बातमीनुसार, योगी आदित्यनाथ यांनी पीडितेच्या कुटुंबियांना व्हिडियो कॉल केला होता. यावेळी पीडितेच्या वडिलांनी गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाही करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी पीडितेच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत, घरातील एका सदस्याला नोकरी आणि घर देण्याचे घोषित केले.
खाली तुम्ही बनावट फोटो आणि मूळ फोटो यांची तुलना पाहू शकता.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस पीडितेच्या दाहसंस्कार लाईव्ह ऑनलाईन पाहिला हा दावा असत्य आहे. पीडितेच्या कुटुंबियांशी व्हिडिओ कॉल केल्याचा फोटो एडिट करून चुकीचा प्रचार केला जात आहे.

Title:योगी आदित्यनाथ यांनी हाथरस पीडितेचे अंत्यसंस्कार लाईव्ह पाहिला होता का?
Fact Check By: Milina PatilResult: False
