अपंग असण्याचे नाटक करून भीक मागणाऱ्या एका व्यक्तीचा पर्दाफाश करणारा व्हिडियो सध्या बराच चर्चेत आहे. या व्हिडियोमध्ये एक व्यक्ती अपंग म्हणून रस्त्यावर घसरत घसरत चालताना दिसतो. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि चार मुलेदेखील आहेत. काही अंतर पार केल्यावर हा व्यक्ती आडोसा धरून बसून कपडे बदलतो आणि दोन्ही पायांवर चालत जातो. त्याचा हा बनाव सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. ही घटना दिल्ली येथील असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक

फेसबुकवर हा व्हिडियो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे.

तथ्य पडताळणी

सदरील व्हिडियो नेमका कुठला आहे हे तपसाण्यासाठी गुगलवर शोध घेतला असता हा व्हिडियो विविध शहरांच्या नावाने गेल्या काही वर्षांपासून फिरत असल्याचे लक्षात आले. मात्र त्याचे निश्चित स्थान कळाले नाही.

मग व्हिडियोचे नीट अध्ययन केले. ही जागा कोणती असेल याचा अंदाज बांधण्यासाठी एकही खून किंवा बोर्ड दिसत नाही. व्हिडियोत दिसणाऱ्या लोकांवरून हा मुस्लिमबहुल भाग असण्याची शक्यता आहे. मात्र, घर, भिंती, रस्ता येथे कुठेच प्लेस मार्क मिळाले नाही. परंतु, व्हिडियोच्या 1.14 मिनिटाला एक पिवळ्या रंगाची रिक्षा जाताना दिसते. व्हिडियोच्या क्वालिटीमुळे तिची नंबर प्लेट दिसत नाही.

वर दिलेल्या फोटोमध्ये दिसणारी रिक्षा भारतातील रिक्षांहून एकदम वेगळी आहे. टांग्यामध्ये जसे बसतात तशी आसनव्यवस्था असलेली रिक्षा भारतात असण्याची शक्यता वाटत नाही. तसेच मागील बाजूने टपावर Q—NGQ असे लिहिलेले दिसते.

या रिक्षाची डिझाईन आणि टपावरील नावाने गुगलवर शोध घेतला असता कळाले की, ही पाकिस्तानमधील QINGQI रिक्षा आहे. तिला पाकिस्तानमध्ये ‘चिंगची’ असे म्हटले जाते आणि पाकिस्तानमध्ये ही अत्यंत लोकप्रिय रिक्षा आहे. ही एक मोटारसायकल रिक्षा आहे.

अधिक शोध घेतल्यावर कळाले की, PLUM QINGQI MOTORS LIMITED नावाची कंपनी ही रिक्षा तयार करते. या कंपनीचे कार्यालय लाहोरमध्ये आहे. चिनमधील JINAN QINGQI MOTORCYCLE कंपनी आणि सुझूकी यांनी एकत्रित येत पाकिस्तानमध्ये ही कंपनी स्थापन केली होती. 

विशेष म्हणजे पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने 2017 साली नोंदणी नसलेल्या ‘चिंगची’ रिक्षांवर बंदी घातली होती. या रिक्षांचा पाकिस्तनामध्ये कसा वापर आणि संख्या वाढत गेली याविषयी तुम्ही येथे वाचू शकता.

हा धागा पकडून मग शोध घेतला असता सदरील व्हिडियो पाकिस्तानचा म्हणून अनेक व्हिडियो आढळले. खाली दिलेल्या व्हिडियोमध्ये ही घटना लाहोर येथील असल्याचे म्हटले आहे. 

https://www.youtube.com/watch?v=IwuhRwes1m0

निष्कर्ष

सदरील व्हिडियोमध्ये दिसणारी रिक्षा पाकिस्तानमधील ‘चिंगची’ रिक्षा आहे. तसेच 2018 पासून हा व्हिडियो पाकिस्तानचा म्हणून इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे हा व्हिडियो भारतातील दिल्ली येथील असल्याचा दावा चूकीचा आहे.

Avatar

Title:अपंग असल्याचे नाटक करणाऱ्या भिकाऱ्याचा व्हिडियो भारतातील नसून, पाकिस्तानमधील आहे.

Fact Check By: Agastya Deokar

Result: False