
गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोना विषाणू थैमान घालत असून, आता कुठे त्यावर लस उपलब्ध झाली आहे. भारताच्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटमध्ये तयार होत असलेली अॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) लस जगभरात पाठविली जात आहे.
लसीची उपयुक्तता आणि प्रभावीपणा याविषयी अजुनही अनेकांच्या मनात संभ्रम आहे. त्यात भर म्हणून बातमी आली की, दक्षिण आफ्रिकेने ‘सीरम’च्या अॅस्ट्राझेनेका लसीचे सुमारे दहा लाख डोस परत करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठीतील अनेक दैनिकांनी ही बातमी प्रसिद्ध केली.
फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता कळाले की, हे वृत्त चुकीचे आहे. दक्षिण आफ्रिकेने असा निर्णय घेतला नसल्याचे समोर आले.
काय आहे दावा?
लोकमत, दिव्य मराठी, महाराष्ट्र टाईम्स, एबीपी माझा, टाईम्स नाऊ अशा विविध वृत्तस्थळांनी 17 फेब्रुवारी 2021 रोजी बातमी प्रसिद्ध केली होती की, “दक्षिण आफ्रिकेने सीरम इन्स्टिट्युटला ‘अॅस्ट्राजेनेका’ लसीचे दहा लाख डोस परत घेण्यास सांगितले आहे. दक्षिण आफ्रिकेत पसरत असलेल्या कोरोनाच्या नवीन प्रकाराविरोधात ही लस प्रभावी ठरत नसल्यामुळे ‘अॅस्ट्राजेनेका’ लसीचा वापर करण्यावर स्थगिती देण्यात आली आहे.”
तथ्य पडताळणी
सर्व दैनिकांनी सदरील बातमी ‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या हवाल्याने दिली आहे. ‘इकॉनॉमिक टाईम्स’ने 16 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी बातमी दिली होती की, दक्षिण आफ्रिकेने सीरम इन्स्टिट्युटला ‘अॅस्ट्राजेनेका’ लसीचे दहा लाख डोस परत घेण्यास सांगितले.
सीरम इन्स्टिट्युटने आफ्रिकेला ‘अॅस्ट्राजेनेका’ लसीचे दहा लाख डोस फेब्रुवारीच्या सुरुवातीला पाठविले होते आणि आगामी काळात आणखी पाच लाख डोस पाठविण्यात येणार होते.
परंतु, आफ्रिकेतील कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारावर (501Y.V2 coronavirus variant) ही लस प्रभावी ठरत नसल्यामुळे तेथील आरोग्य प्रशासनाने या लसीचा वापर थांबविला आणि ते डोस ‘सीरम’ला परत करण्याचा निर्णय घेतला, असे ‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या बातमीत म्हटले आहे.
‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेनेही ‘इकॉनॉमिक टाईम्स’ची ही बातमी घेतल्यामुळे देशभरातील विविध भाषांमधील वेबसाईट्सने तसे वृत्त दिले.
मग खरं काय?
सर्वप्रथम आम्ही आफ्रिकेतील न्यूज वेबसाईटवर याविषयी माहिती शोधली. तेव्हा कळाले की, दक्षिण आफ्रिकेचे आरोग्यमंत्री Dr Zweli Mkhize यांनी तेथील संसदेत कोरोना लस परत करण्याचे वृत्त फेटाळले आहे.
आफ्रिकेतील ‘टाईम्स लाईव्ह’ नावाच्या वेबसाईटवर 16 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, Dr Mkhize यांनी संसदेत सांगितले की, दक्षिण आफ्रिकेने सीरम इन्स्टिट्युटला 10 लाख डोस परत केलेले नाही.
मूळ वेबसाईट – टाईम्स लाईव्ह । अर्काइव्ह
मग आम्ही Dr Mkhize यांचे संसदेतील भाषण ऐकले. 16 फेब्रुवारी रोजी संसदेतील भाषणात नवव्या मिनिटाला ते स्पष्ट म्हणतात की, “भारताला कोरोना लस परत करणार असल्याचे वृत्त मी फेटाळू इच्छितो. आम्ही तसा कोणताही निर्णय घेतलेला नाही.”
आफ्रिकेत दावा केला जात होता की, भारतातून आलेली ‘अॅस्ट्राजेनेका’ लस एक्सपायर झाली. हा दावासुद्धा आरोग्यमंत्र्यांनी फेटाळत सांगितले की, “आमच्या तज्ज्ञ मंडळाने ‘अॅस्ट्राजेनेका’ लसीची एक्सपायरी डेट 30 एप्रिल ठरवलेली आहे. त्यामुळे लस एक्सपायर झाल्याची माहिती चुकीची आहे.”
आरोग्यमंत्री Dr Mkhize यांच्या स्पष्टीकरणानंतर ‘इकॉनॉमिक टाईम्स’ने आपल्या बातमीमध्ये सुधारणा केली.
मग ‘इकॉनॉमिक टाईम्स’ने खोटी बातमी दिली का?
दिव्या राजगोपाल नामक रिपोर्टरने सर्वप्रथम ही बातमी दिली होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्यमंत्र्यांनीच ही बातमी फेटाळल्यानंतर तिच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित होऊ लागली.
यानंतर राजगोपाल यांनी ट्विटरवर खुलासा केला की, “अत्यंत विश्वासार्ह सुत्राने माहिती दिल्यानंतरच मी बातमी केली होती. दक्षिण आफ्रिका आणि सीरम इन्स्टिट्युटमध्ये खरंच लस परत करण्याविषयी चर्चा सुरू होती. कारण एप्रिलमध्ये लस एक्सपायर होणार असून, ती त्यांच्या काहीच कामाची राहणार नाही. त्यामुळे ते परतावा (Refund) मागत होते.”
हा धाग पकडून आम्ही अधिक शोध घेतला. त्यातून कळाले की, कोरोनाच्या नवीन प्रकारावर ‘अॅस्ट्राजेनेका’ लस प्रभावी ठरत नसल्यामुळे दक्षिण आफ्रिका प्रशासन सीरम इन्स्टिट्युटकडे लस पुरवठ्याविषयी मुदतवाढ किंवा एक्सचेंजची बोलणी करीत होते.
‘रॉयटर्स’ने दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य मंत्रालयातील उप महासंचालक अनबॅन पिल्लाय यांच्या हवाल्याने 8 फेब्रुवारीला ही बातमी दिली होती.
म्हणजेच दक्षिण आफ्रिका आणि सीरम इन्स्टिट्युटमध्ये दहा लाख डोसबाबत चर्चा सुरू होती. मात्र त्यांनी ते डोस परत केल्याचे वृत्त बरोबर नाही.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, दक्षिण आफ्रिकेने सीरम इन्स्टिट्युटला कोरोना लसीचे 10 लाख डोस परत करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त निराधार आहे. तेथील आरोग्यमंत्र्यांनीच हे वृत्त फेटाळून लावले.
[आपल्याकडेदेखील असेच संशयास्पद मेसेज असतील तर पडताळणीसाठी ते आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॉरवर्ड करा किंवा या क्रमांकावर ‘Hi’ मेसेज पाठवून लेटेस्ट फॅक्ट-चेकसुद्धा वाचा – तेसुद्धा आपल्या आवडीच्या 8 भाषांमध्ये !]

Title:दक्षिण आफ्रिका सीरम इन्स्टिट्युटच्या कोरोना लसीचे 10 लाख डोस परत करणार का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
