इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना राजस्थानमध्ये झाली; गुजरातमध्ये नाही

False राजकीय | Political

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना समोर आली आहे. इंदिरा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचे फोटो व्हायरल होऊ लागले. असाच एक फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, भाजपची सत्ता असणाऱ्या गुजरातमध्ये या पुतळ्याची विटंबना झाली. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली.

आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला. हा फोटो राजस्थानमध्ये झालेल्या विटंबनेचा आहे. 

काय आहे दावा?

नागपुरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी विटंबना झालेल्या पुतळ्याचा फोटो शेअर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला. 

त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्ही इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड करू शकता, परंतु, त्यांच्या विचारांची नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातचा हा फोटो आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले असता कळाले की हा फोटो गुजरातचा नाही. 

दैनिक भास्करच्या बातमीनुसार हा फोटो राजस्थानमधील काजडा गावातील आहे. या गावातील एका युवकाने 17 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर पुतळ्याची विटंबना करणार असल्याची घोषणा केली हती. रात्री दहाच्या सुमारास त्याने पुतळ्याची तोडफोड केली.

टाईम्स नाऊ चॅनेलसुद्धा या घटनेची बातमी दिली होती. राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील पिलानी भागातील काजडा गावात हा प्रकार घडला होता. गावाच्या सरपंचाच्या तक्रारीवरून पोलिसांनी सदरील तरुणाविरोधात गुन्हा नोंदविला असून पोलिस तपास करत आहेत. 

झी न्यूजच्या बातमीनुसार, आरोपी तरुणाचे नाव मुकेश गुर्जर आहे. पुतळ्याची विटंबना केल्यानंतर तो गुजरातला पळून गेला होता. पोलिसांनी त्याला वडोदरा शहारातून अटक केले. 

गावातील सार्वजनिक बागेला सरपंचाने टाळे लावल्याने लहान मुलांना खेळता येत नव्हते. त्यामुळे नाराज झालेल्या या तरुणाने एक लहान मुलगा व आणखी एक साथीदारासह पुतळ्याची तोडफोड केली. 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा हा फोटो गुजरातमधील नसून, राजस्थानमधील आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना राजस्थानमध्ये झाली; गुजरातमध्ये नाही

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False