FACT CHECK: अमिताभ बच्चन यांनी कोरोनामुक्त झाल्यावर हाजी अलीला भेट दिली का?

False सामाजिक

अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना जुलै महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही आठवड्यांच्या उपचारांनंतर दोघांनी कोरोनावर मात केली. सोशल मीडियावर आता दावा केला जात आहे की, कोरोनातून ठीक झाल्यानंतर अमिताभ बच्चन सर्वप्रथम मुंबईतील हाजी अली दर्गा येथे भेट देऊन चादर चढविली. बच्चन यांच्या फोटोला धार्मिक रंग देऊन त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. दर्गाला भेट देण्याचा हा फोटो 2011 मधील आहे.

काय आहे दावा

अमिताभ बच्चन चादर घेऊन दर्गा येथे जातानाचा एक फोटो शेयर करून लिहिले की, “जब इस को कोरोना हुआ था तब इसके जल्द ही स्वस्थ होने के लिए मंदिरों मे आरती..यग..सुंदर काण्ड का अखंड पाठ हो रहा था…और ये ठीक होने के बाद चादर चढ़ाने हाजी अली की दरगाह गया. Boycott कौन बनेगा करोडपती.

फेसबूकआर्काइव 

तथ्य पडताळणी 

व्हायरल होत असलेल्या फोटोत गर्दी आहे. कोरोनामुळे अजून तरी देवस्थाने उघडलेले नाहीत. त्यामुळे हा फोटो नेमका कधीचा आहे, हे शोधणे गरजेचे आहे.

सर्वप्रथम या फोटोला गुगल रिव्हर्स सर्च इमेज द्वारे शोधले. तेव्हा काही बातम्यांमध्ये हा फोटो आढळला. ‘द हिंदु’ने 5 जुलै 2011 रोजी प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, हा फोटो अमिताभ बच्चन यांनी राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्गा येथे भेट दिली होती तेव्हाचा आहे. अमिताभ यांनी 40 वर्षांपूर्वी एक नवस केला होता, तो पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी 2011 साली अजमेर शरीफला चादर चढवली होती. 

मुळ बातमी येथे वाचाआर्काइव

अमिताभ बच्चन यांनी 40 वर्षानंतर अजमेर शरीफला भेट दिली होती म्हणून त्यावेळी ही मोठी बातमी ठरली होती. अनेक न्यूज मीडियाने या भेटीची त्यावेळी दखल घेतली होती. 

निष्कर्ष 

कोरोनामुक्त झाल्यानंतर अमिताभ यांनी हाजी अली दर्गा येथे भेट दिली नाही. दर्गा भेटीचा तो फोटो 2011 मधील असून, त्यावेळी अमिताभ यांनी नवस फेडण्यासाठी अजमेर शरीफला भेट दिली होती. चुकीच्या दाव्यासह हा जुना फोटो शेयर करण्यात येत आहे.

Avatar

Title:FACT CHECK: अमिताभ बच्चन यांनी कोरोनामुक्त झाल्यावर हाजी अलीला भेट दिली का?

Fact Check By: Milina Patil 

Result: False