प्लास्टिकपासून बनावट गहू तयार करण्याचा फेक व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

False राजकीय | Political

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मशिनमध्ये प्लास्टिक टाकून त्यापासून छोटे छोटे दाणे तयार केले जातात. दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओमध्ये प्लास्टिक पासून बनावट गहू तयार केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, हा व्हडिओ प्लास्टिक पुनर्प्रक्रियेचा (Plastic Recycling) आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये सर्व प्रथम एका मशिनमध्ये प्लास्टिक टाकून छोटे दाणे तयार केले जातात. युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना लिहितात की, “गव्हाचे भेसळ करण्यासाठी हुबेहूब बनावट गहू तयार करण्याचा कारखाना. एका कट्ट्यात किमान पाच ते दहा किलो हा बनावट गहू टाकत असतील,तर आपल्या आरोग्याचे तीन तेरा वाजणारच.”

मुळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओमध्ये ‘Smartest Worker’ असे नाव दिसते.

शोध घेतल्यावर कळाले की, स्मार्टेस्ट वर्क या इंस्टाग्राम पेजने 24 सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ अपलोड केला होता. व्हिडिओच्या कॅप्शननुसार यामध्ये प्लास्टिकची पुर्नप्रक्रिया कशी केली जाते हे दाखविण्यात आले आहे. 

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कुठे ही बनावट गहू तयार करण्याचा उल्लेख नाही.

कीव्हर्ड सर्च केल्यावर युट्यूबवर प्लास्टिक पुर्नप्रक्रियेशी संबंधित अनेक व्हिडिओ समोर आले जे व्हायरल व्हिडिओसारखेच आहेत.

प्लास्टिक पुर्नप्रक्रिया कशी केली जाते?

सर्वप्रथम ‘डस्ट क्लीनर मशिन’ने प्लास्टिक स्वच्छ केले जाते. यानंतर ते प्लास्टिक ‘स्क्रॅप ग्राइंडर मशीन’मध्ये टाकून त्याचे छोटे तुकडे केले जातात. हे तुकडे ‘वॉशिंग कन्व्हेयर’ नावाच्या मशीनमध्ये ठेवले जातात जे त्यांना स्वच्छ करतात. पुढे ओले प्लास्टिकचे तुकडे सुकविण्यासाठी ते ‘फिल्म ड्रायर मशीन’मध्ये टाकले जातात. मग हे वाळलेले तुकडे ‘एग्लोमेरेटर मशीन’मध्ये टाकले जातात जिथे त्यांना कापून आधिक बारीक केले जाते. त्यातून ते ‘हीटिंग बॅरल’मध्ये टाकले जाते. मग त्याला पाण्याच्या साह्याने थंड करून कटरमध्ये टाकले जाते व ग्रेन्युल्स म्हणजेच प्लास्टिकचे छोटे दाणे तयार केले जातात.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये बनावट गहू तयार केले जात नव्हता, हा प्लास्टिक पुर्नप्रक्रियेचा व्हिडिओ आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:प्लास्टिकपासून बनावट गहू तयार करण्याचा फेक व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: False