
कोरोनामुळे जगभरात आर्थिक संकट पसरलेले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक दिवस उत्पादन बंद राहिले. त्यामुळे बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत असून, युवकांना नोकरीची चिंता भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर एका व्हिडिओ पसरवून दावा केला जात आहे की, संतापलेल्या बेरोजगार युवकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ताफा अडवून निषेध केला.
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडिओ 2017 सालचा असल्याचे समोर आले. त्यामुळे जुन्या व्हिडिओला आताचा सांगून चुकीचा दावा करण्यात येत आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
तीन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये, काही तरुण योगी सरकारविरोधात घोषणा देत ताफ्यातील गाड्यांवर धावून जाताना दिसतात. पोलिस आणि एनएसजी कमांडो या तरुणांवर बळाचा वापर करीत बाजूला ढकलून देतात. भर रस्त्यावरील या गोंधळामुळे परिस्थिती तणावपूर्वक बनते.
सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, “सीएम अदित्यनाथ यांच्या ताफा अडवून बेरोजगार यूवकांनी निषेध केला.”
मूळ व्हिडिओ येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम की-वर्डद्वारे आणि की-फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर युट्यूबवर तीन वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ आढळला. म्हणजे हा व्हिडिओ यावर्षीचा नाही.
याविषयी अधिक सर्च केल्यावर कळाले की, 7 जून 2017 रोजी ही घटना घडली होती. योगी आदित्यनाथ लखनऊ विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी आले होते तेव्हा समजवादी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. त्या घटनेचा हा व्हिडिओ आहे.
या प्रकरणी सतवंत सिंग, नितीन राज, पूजा शुक्ला, अनिल कुमार यादव, अंकित कुमार सिंग, राकेश कुमार, मधुर्या सिंग आणि अपूर्वा वर्मा या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटके केले होते. लखनऊ विद्यापीठानेसुद्धा या विद्यार्थ्यांवर कारवाई केली होती.
लखनऊ विद्यापीठामध्ये ‘हिंदू स्वराज दिवस’ या कार्यक्रमासाठी योगी आदित्यनाथ आले होते. त्याला या विद्यार्थ्यांचा विरोधा होता.
‘न्यूजलाँड्री’ या वेबसाईटशी बोलताना विद्यार्थी पूजा शुक्ला म्हणाली होती की, लखनऊ विद्यापीठ प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरविण्यात दिरंगाई केली जाते. शैक्षणिक निधी विद्यार्थ्यांवर खर्च करण्याऐवजी विद्यापीठद्वारे तो निधी निरर्थक राजकीय कार्यक्रमांवर उधळला जात आहे. योगी आदित्यनाथांचा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी आयोजित केला नव्हता. त्यामुळे प्रशासनाने त्यासाठी निधी खर्च करणे म्हणजे घोटाळाच आहे.”

मूळ बातमी येथे वाचा – न्यूजलाँड्री
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, योगी आदित्यनाथ यांचा ताफा अडविण्याचा हा व्हायरल व्हिडिओ 2017 मधील आहे. हे विद्यार्थी विद्यापीठाद्वारे आयोजित कार्यक्रमाला विरोध करीत होते.
त्यामुळे बेरोजगार युवकांनी योगी आदित्यनाथांचा ताफा अडवून निषेध केल्याचा दावा असत्य आहे.

Title:बेरोजगार युवकांनी योगी आदित्यनाथ यांचा ताफा रोखल्याचा दावा खोटा; वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
