
सध्या इस्रायल आणि हमासमधील संघर्ष विकोपाला गेला असताना सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत दिसतात.
या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू देशावर युद्धाचे सावट असताना आपल्या मुलाला देशाच्या संरक्षणासाठी युद्धभूमीवर पाठवत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो जुना असून सध्याच्या इस्रायल आणि हमास युद्धाशी संबंधित नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “इजराइल चे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू देशावर युद्धाचे सावट असताना आपल्या मुलाला देशाच्या संरक्षणासाठी युद्धभूमीवर पाठवत आहेत.”

मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटो सध्याचा नसून नऊ वर्षांपूर्वीचा आहे.
टाइम्स ऑफ इस्रायलच्या बातमीनुसार 1 डिसेंबर 2014 रोजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचा धाकटा मुलगा अवनेर नेतन्याहू याने इस्रायल संरक्षण दलात (IDF) आपली लष्करी सेवा सुरू केली होती.

मूळ पोस्ट – टाइम्स ऑफ इस्रायल
सदरील माहितीच्या आधारे अधिक सर्च केल्यावर कळाले की, इस्रायलमध्ये सुरक्षा सेवा कायद्यानुसार ज्यू, ड्रुझ आणि सर्कॅशियन पार्श्वभूमी असलेल्या इस्रायली नागरिकांना वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना देशासाठी लष्करी सेवा देणे सक्तीचे आणि अनिवार्य आहे.
परंतु, या ठिकाणी इस्रायली अरब, धार्मिक स्त्रिया, विवाहित व्यक्ती आणि शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अयोग्य असलेल्या नागरिकांना सक्तीच्या लष्करी सेवेतून सूट देण्यात आली आहे.
एकदा निवड झाल्यावर पुरुषांनी किमान 32 महिन्यांसाठी आणि महिलांनी किमान 24 महिन्यांसाठी सेवा देणे अपेक्षित आहे. अधिक माहिती येथे वाचू शकतात.
व्हायरल फोटोमधील अवनेर नेतन्याहू यांनी 2017 मध्ये त्यांची अनिवार्य लष्करी सेवा पूर्ण केली. अवनरने कॉम्बॅट इंटेलिजन्स कलेक्शन कॉर्प्स या लष्करी युनिटमध्ये सेवा दिली.
निष्कर्ष
व्हायरल फोटो सध्याचा नसून 2014 सालचा आहे, जेव्हा अवनेर नेतन्याहू यांनी कॉम्बॅट इंटेलिजन्स कलेक्शन कॉर्प्समध्ये (IDF) लष्करी सेवा सुरू केली होती. भ्रामक दाव्यासह सध्याच्या इस्रायल आणि हमास युद्धाशी हा फोटो जोडला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:इस्रायलच्या पंतप्रधानांनी आपल्या मुलाला हमासविरुद्ध लढण्यासाठी पाठवले का? वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Missing Context
