शिवसेनेच्या पोस्टरवर आता बाळासाहेबांच्या गळ्यात भगव्याऐवजी ‘हिरवा शेला’? वाचा सत्य

False राजकीय | Political

शिवसेनेच्या मुंबईतील एका नेत्याचे टिपू सुलतानाला अभिवादन करणारे पोस्टर सोशल मीडियावर सध्या बरेच गाजत आहे. या पोस्टरवर शिवसेनेच्या पारंपरिक भगव्या रंगा ऐवजी हिरवा वापरलेला दिसतो. अगदी पक्षाचे नाव, लोगो आणि बाळासाहेब ठाकरेंचा प्रसिद्ध भगवा शेलासुद्धा हिरव्या रंगात दाखवलेला आहे. 

या पोस्टरवरून शिवसेने विचारधारा बदलली का? असा सवाल केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, संपूर्ण हिरव्या रंगाचे पोस्टर बनवाट आहे.

काय आहे दावा?

हिरव्या रंगातील शिवसेनेचे हे पोस्टर शेअर करून सोबत म्हटले की, ‘मराठा माणूस, कट्टर भगवावाद, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर राजकारण करणाऱ्या एका स्थानिक राजकीय पक्षाने सध्या असे अवतार केला आहे.’

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

या पोस्टरचा आधार घेत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका करत म्हटले की, शिवसेनेने आता स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या गळ्यातील भगवा शेला काढून त्याजागी हिरवा शेला घालण्याचे पापही पूर्ण केले.

तथ्य पडताळणी

या पोस्टरवर सलमान हाशमी नामक शिवसेनेच्या युवा संघटकाचा फोटो आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडो हिंदीने थेट त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी वरील पोस्टर बनावट असल्याचे आम्हाला सांगितले.

“व्हायरल होत असलेले पोस्टर फेक आहे. माझ्या पोस्टरला एडिट करून त्यालाहिरवा रंग देण्यात आला आहे,” असे ते म्हणाले. “माझ्या सगळ्या पोस्टरवर केशरी रंगाची बॉर्डर असते आणि बाळासाहेब ठाकरेंचा शेलासुद्धा नेहमी भगवा असतो. विरोधीपक्षातर्फे शिवसेनेला बदनाम करून धार्मिक भावना भडकावण्याचे काम करण्यात येत आहे. असे करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई झाली पाहिजे.” 

त्यांनी फॅक्ट क्रेसेंडोला मूळ पोस्टरसुद्धा पाठवले. ते तुम्ही खाली पाहू शकता.

सलमान हाशमी यांच्या फेसबुक अकाउंटवर आम्हाला इतरही पोस्टर आढळले. या सर्व पोस्टरमध्ये भगव्या रंगाची बॉर्डर आहे. तसेच शिवसेनेचे नाव, लोगो आणि बाळासाहेब ठाकरेंचा शेला सगळे मूळ पद्धतीनेच आहे. 

सलमान हाशमी यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रारसुद्धा दाखल केलेली आहे. त्यांनी भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर त्यांचे बनावट पोस्टर तयार करून बदनामी केल्याचा आरोप केला आहे. 

Archive

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, शिवसेनेच्या मूळ पोस्टरशी छेडछाड करून त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवसेनेच्या नेत्याने हिरव्या रंगाचे पोस्टर तयार केले नव्हते. 

[आपल्याकडेदेखील असेच संशयास्पद मेसेज असतील तर पडताळणीसाठी ते आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॉरवर्ड करा किंवा या क्रमांकावर ‘Hi’ मेसेज पाठवून लेटेस्ट फॅक्ट-चेकसुद्धा वाचा – तेसुद्धा आपल्या आवडीच्या 8 भाषांमध्ये !]   

Avatar

Title:शिवसेनेच्या पोस्टरवर आता बाळासाहेबांच्या गळ्यात भगव्याऐवजी ‘हिरवा शेला’? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False