अक्षय कुमारच्या हातात ABVP चा झेंडा? वाचा काय आहे सत्य

False सामाजिक

सोशल मीडियावर अभिनेता अक्षय कुमारचा हातात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (एबीव्हीपी) झेंडा धरल्याचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, अक्षय कुमारने जेएनयूमध्ये झालेल्या हिंसेचे समर्थन करीत एबीव्हीपीला पाठिंबा दिला होता.

नोव्हेंबर-डिसेंबर 2019 मध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) वाढीव फी विरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान विद्यापीठाच्या वसतिगृहावर हल्ला झाला होता. त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. 

काय आहे दावा

सोशल मीडियावरील व्हायरल फोटोमध्ये अक्षय कुमार एका व्यासपीठावर उभा आहे. त्याच्या हातात एबीव्हीपीचा झेंडा दिसतो. कॅप्शनमध्ये म्हटले की, जेएनयूमध्ये झालेल्या हिंसेनंतर बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने एबीव्हीपीला समर्थन दिले.

मूळ पोस्ट – फेसबुकआर्काइव्ह 

तथ्य पडताळणी 

सर्वप्रथम या फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केले. त्याद्वारे कळाले हा फोटो 2018 मधील आहे. अक्षय कुमारच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून 22 जानेवारी 2018 हा फोटो शेअर करण्यात आला होता. 

सोबतच्या माहितीनुसार, दिल्ली विद्यापीठातील (DU) महिलांच्या मॅरेथॉनला अक्षय कुमारने झेंडी दाखवून सुरूवात केली होती. महिला सक्षमीकरण आणि करमुक्त सॅनिटरी पॅडसाठी ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती.

अक्षय कुमारच्या हातात एबीव्हीपीचा झेंडा स्पष्ट दिसतो. मग मॅरेथॉनमध्ये एबीव्हीपीचा झेंडा का?

मूळ पोस्ट – फेसबुक

अधिक शोध घेतल्यावर कळाले की, दिल्ली विद्यापीठामध्ये एबीव्हीपीतर्फे ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. त्याचदरम्यान अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपटदेखील रिलीज होणार होता. चित्रपटाची प्रसिद्धी करण्याच्या हेतूने अक्षय कुमार या कार्यक्रमाला हजर होता. एबीव्हीपीच आयोजक असल्यामुळे मॅरेथॉनच्या उद्घघाटनच्यावेळी त्याच्या हातात एबीव्हीपीचा झेंडा होता. 

न्यूजलाँड्रीआर्काइव्ह 

निष्कर्ष 

यावरून स्पष्ट होते की, अक्षय कुमार चित्रपटाच्या प्रोमोशन करण्यासाठी 2018 मध्ये दिल्ली विद्यापीठात गेला होता. तेथे एबीव्हीपीने आयोजित केलेल्या मॅरेथॉनचे त्याने झेंडी दाखवून उद्घाटन केले होते. त्यामुळे या फोटोचा 2019 मध्ये जेएनयूत झालेल्या हिंसाचाराशी काही संबंध नाही.

Avatar

Title:अक्षय कुमारच्या हातात ABVP चा झेंडा? वाचा काय आहे सत्य

Fact Check By: Milina Patil 

Result: False