गोव्या महामार्गावरील अपघतात या 17 महिला डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला का? वाचा सत्य

False सामाजिक

गोव्याला जात असाताना एका मिनीबसचा अपघात होऊन 17 महिला डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला, अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. महिलांच्या एका ग्रुपचा फोटो शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. त्यानुसार कळाले की, सदरील अपघातामध्ये मृत्यू पावलेली केवळ एकच महिला डॉक्टर होती.

काय आहे दावा?

दावनगिरी मेडिकल असोसिएशनच्या महिला शाखेच्या सदस्यांच्या बसला अपघात होऊन 17 डॉक्टरांचा मृत्यू झाला असे व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे.

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम आम्ही तपास केला की, असा काही खरंच अपघात झाला का. त्यानुसार, टाईम्स ऑफ इंडियाची एक बातमी आढळली. 15 जानेवारी 2021 रोजी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर धारवाड जवळ मिनी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता.

यामध्ये एकुण 11 जणांचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी झाले होते. दावणगिरी येथील सेंट पॉल्स कॉन्व्हेंट शाळेतील या माजी विद्यार्थिनी स्नेहसंमेलनासाठी गोव्याला जात असताना हा अपघात झाला.

मूळ बातमी – टाईम्स ऑफ इंडिया

सदरली बातमीमध्ये कुठेही 17 डॉक्टरांचा मृत्यू झाला असा उल्लेख नाही. तसेच पीडितांच्या यादीत केवळ वीणा प्रकाश यांच्या नावासमोर डॉक्टर म्हटलेले आहे. 

अधिक शोध घेतला असता ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ची बातमी आढळली. या अपघातानंतर सेंट पॉल्स कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक व पीडितांचे परिजन यांनी व्यक्त केलेल्या भावना या लेखामध्ये दिलेल्या आहेत.

डॉ. विणा प्रकाश दावणगिरी येथे स्त्रीरोडतज्ज्ञ होत्या. यामध्येसुद्धा कुठेही सगळ्या महिला डॉक्टर होत्या, असा उल्लेख नाही. 

मूळ बातमी – द न्यू इंडियन एक्सप्रेसअर्काइव्ह

फॅक्ट क्रेसेंडो गुजरातीने धारवडचे पोलीस अधिक्षक पी. कृष्णकांत यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सोशल मीडियावरील दावे फेटाळून लावले.

“या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्यांमध्ये केवळ एकच महिला डॉक्टर होती. सोशल मीडियावर 17 डॉक्टरांच्या मृत्यूचा दावा असत्य आहे,” असे ते म्हणाले.

तसेच दावणगिरी येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. प्रसन्न अनाबेरू यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, “अपघातामध्ये 17 महिला डॉक्टरांचा मृत्यू झाला ही चुकीची माहिती आहे. त्या बसमध्ये केवळ डॉ. वीणा याच डॉक्टर होत्या.”

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, गोव्याला जाताना झालेल्या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या सगळ्या महिला डॉक्टर नव्हत्या. त्यात केवळ एकाच डॉक्टर महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे 17 महिला डॉक्टरांच्या मृत्युचा दावा असत्य ठरतो.

[आपल्याकडेदेखील असेच संशयास्पद मेसेज असतील तर पडताळणीसाठी ते आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॉरवर्ड करा किंवा या क्रमांकावर ‘Hi’ मेसेज पाठवून लेटेस्ट फॅक्ट-चेकसुद्धा वाचा – तेसुद्धा आपल्या आवडीच्या 8 भाषांमध्ये !]

Avatar

Title:गोव्या महामार्गावरील अपघतात या 17 महिला डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False