आंध्रप्रदेशातील स्वामी समर्थांच्या मूर्तीचा फोटो मुंबईतील मठाच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक

सोशल मीडियावर स्वामी समर्थ आणि त्यांच्या पादुकांचा फोटो व्हायरल होत आहे. सोबत दावा जात आहे की, मुंबईतील महालक्ष्मी परिसरातल्या श्री स्वामी समर्थ मठातील हा अतिशय जुना व दुर्मिळ फोटो आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

तथ्य पडताळणीअंती कळाले की, हा फोटो मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील मठाचा नाही. 

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मुंबईतील महालक्ष्मी परिसरातल्या श्री स्वामी समर्थ मठाचा हा अतिशय जुना व दुर्मिळ फोटो. या मठामध्ये स्वामींनी मुखातून काढून दिलेल्या आत्मलिंग पादुका आहेत. हा मठ फक्त गुरुवारीच भाविकांना दर्शनासाठी खुला असतो. हा दुर्मिळ फोटो असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे “स्वामी दर्शन” पोहोचवा.”

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

सदरील फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आंध्रप्रदेशातील कर्दळीवन या ठिकाणाचे नाव समोर आले. व्हायरल पोस्टखालीसुद्धा अनेकजणांनी हा फोटो कर्दळीवनातील असल्याचे म्हटले आहे. हा धागा पकडून आम्ही कर्दळीवनाचा शोध घेतला.

श्री दत्त महाराज या वेबसाईटवरील माहितीनुसार, आंध्रप्रदेशातील ‘कर्दळीवन’  या स्थानाला दत्त संप्रदायात विशेष महत्त्वाचे स्थान आहे. कर्दळीवन हे श्रीदत्तगुरूंचे गुप्त स्थान आणि श्रीस्वामी समर्थांचे प्रकटस्थान आहे. अन्य अनेक ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक संदर्भ या स्थानाला आहेत. (अर्काइव्ह)

वासूदेव शाश्वत अभियान युट्यूब चॅनेलवर कर्दळीवनाविषयीचा एक व्हिडिओ आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता

4.43 मिनिटावर या व्हिडिओमध्ये व्हायरल फोटोशी साम्य असणारी फ्रेम दिसते. दोन्हींची तुलना केली असता हा मूळ फोटो कर्दळीवनातील असल्याचे सिद्ध होते.

कर्दळीवनाविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही येथे भेट देऊ शकता – Kardalivan: Mini DVD

कर्दळीवनातील स्वामींची मूर्ती व पादुकांचा वेगळ्या अँगलचे फोटो तुम्ही खाली पाहू शकता.

मुंबईतील श्री स्वामी समर्थ मठ

मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील मोना अपार्टमेंट इमारतीच्या प्रांगणात स्वामी समर्थ मठ आहे. महालक्ष्मी मंदिरापासून हा मठ पायी केवळ 2 मिनिटांच्या अंतरावर आहे. श्री. अगसकर यांनी हा मठ 1792 साली उभारण्यात आला होता. स्वामींनी आपल्या मुखातून काढलेल्या आत्मलिंगी पादुका आगसकर यांनी दिल्या होत्या. या पादुका या मठात ठेवण्यात आलेल्या आहेत. 

महालक्ष्मी परिसरातील या स्वामी समर्थ मठाचे लोकेशन येथे पाहा – गुगल मॅप

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला स्वामी समर्थ्यांच्या मूर्तीचा फोटो मुंबईतील नसून, आंध्रपदेशातील कर्दळीवन येथील आहे. 

Avatar

Title:आंध्रप्रदेशातील स्वामी समर्थांच्या मूर्तीचा फोटो मुंबईतील मठाच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)


Leave a Reply