नदीकिनारी मृतदेहाच्या विटंबनेचा हा फोटो योगी आदित्यानाथ यांच्या कार्यकाळातील नाही; वाचा सत्य 

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय

मशिदींवरील भोग्यांवरून राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे. आधी मशिदींवरील आणि  त्यानंतर इतर प्रार्थनास्थळांवरील भोंगे काढण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये 11 हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले. 

या कारवाईचे स्वागत करताना राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तुती करत ट्विट केले होते की, “उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.”

या ट्विटनंतर अनेकांनी उत्तर प्रदेश सरकारच्या कोविडकाळातील अपयशाकडे निर्देश करत महाराष्ट्राला उत्तर प्रदेशकडून शिकण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले. त्यासाठी पुरावा म्हणून नदीकिनाऱ्यावर कुत्र्याकडून होणाऱ्या मृतदेहाच्या विटंबनेचा फोटो शेअर केला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

तथ्य पडताळणीअंती कळाले की, हा फोटो 2008 सालातील असून, योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातील नाही. 

काय आहे दावा?

घाटावर मृतदेह खाणाऱ्या कुत्र्याचा फोटो शेअर करून म्हटले आहे की, “योगी” कडून महाराष्ट्राला काही शिकण्याची गरज नाही. मुख्यमंत्री मा. श्री. उध्दव  ठाकरे  आहेत म्हणूनच महाराष्ट्रातील जनतेला नद्यामध्ये हे चित्र दिसले नाही. आणि महाराष्ट्रात उदाहरण देत बसू नका.”

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

या फोटोचे निरीक्षण केल्यावर Alamy असा वॉटरमार्क दिसतो. Alamy ही एक फोटो स्टॉक वेबसाईट आहे. 

या वेबासाईट शोध घेतला असता मूळ फोटो मिळाला. या फोटोसोबत दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो उत्तर प्रदेशच्या वाराणसी शहरातील एका घाटावरचा आहे.

तसेच हा फोटो 20 फेब्रुवारी 2008 रोजी काढण्यात आला होता, असेसुद्धा नमुद करण्यात आलेले आहे.

मूळ फोटो – Alamy

म्हणजेच हा फोटो जवळपास चौदा वर्षे जुना आहे. योगी आदित्यनाथ 2017 साली पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे या फोटोचा त्यांच्या कार्यकाळाशी संबंध नाही.

परंतु, हेदेखील तितकेच सत्य आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये उत्तर प्रदेश व बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात नद्यांमध्ये बेवारस मृतदेह आढळून आले होते. कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्काराच्या अपुऱ्या सुविधांमुळे मृतदेह नदीमध्ये सोडण्यात येत होते किंवा नदी किनारी दफन करण्यात येत होते.

मे 2021 मध्ये उत्तर प्रदेशच्या यमुना नदीत अनेक मृतदेह आढळले होते. गंगा नदीमध्ये 70 हून जास्त मृतदेह मिळाले होते.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, चौदा वर्षे जुना फोटो व्हायरल होत आहे. कोविड काळात उत्तर प्रदेशमध्ये नदीत मृतदेह आढळले होते, हे जरी सत्य असले तरी, कुत्र्याकडून होणाऱ्या मृतदेहाच्या विटंबनेचा तो व्हायरल फोटो फक्त योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातील नाही.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:नदीकिनारी मृतदेहाच्या विटंबनेचा हा फोटो योगी आदित्यानाथ यांच्या कार्यकाळातील नाही; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Misleading


Leave a Reply