ऑक्सफर्ड विद्यापीठाने मनमोहन सिंग यांच्या नावे स्कॉलरशीप सुरू केली आहे का? वाचा सत्य

Mixture राजकीय | Political

शिक्षणाची पंढरी म्हणून इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रसिद्ध आहे. यावर्षीच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये ऑक्सफर्डला पाचवे स्थान मिळाले आहे. अशा या ऐतिहासिक विद्यापीठाने माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ्ज डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावे शिष्यवृत्ती सुरू केल्याचा सोशल मीडियावर दावा केला जात आहे. आठशे वर्षांचा देदिप्यमान इतिहास असणाऱ्या या विद्यापीठाने डॉ. सिंग यांच्य विद्वत्तेला ओळखून हा निर्णय घेतला आणि आपल्या देशात मात्र त्यांना योग्य सन्मान दिला जात नाही, असे व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

काय आहे पोस्टमध्ये?

डॉ. मनमोहन सिंग आणि त्यांच्या पत्नीचा फोटो शेयर करून सोबत लिहिलेले आहे की, आठशे वर्षे जून्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावे शिष्यवृत्ती सुरू केली आहे. एका विद्वान व्यक्तीचे महत्त्व अधोरेखित करून उचित सन्मान मिळाल्याचा सर्व भारतीयांनी अभिमान बाळगला पाहिजे. परंतु, या घटनेची दखल भारतीय मीडियाने घेतली नाही. हा मेसेज सर्वांना पाठवून कळू द्या लोकांना की, ते ज्यांची मस्करी करतात त्यांना जग सलाम करते. भारतीय अर्थव्यवस्थेची पायाभरणी करणारे डॉ. सिंग महान आहेत.

तथ्य पडताळणी

ऑक्सफर्ड विद्यापीठाने खरंच मनमोहन सिंग यांच्या नावे शिष्यवृत्ती सुरू केली का हे तपासण्यासाठी त्या विद्यापीठाची वेबसाईट तपासली. ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची माहिती देणाऱ्या पेजवर मनमोहन सिंग यांच्या नावे कोणीतीही स्कॉलरशीप देत असल्याचे आढळले नाही.

वेबसाईटच्या डेटाबेसमध्ये मनमोहन सिंग असे सर्च केल्यावर, डॉ. सिंग यांची प्रोफाईल मिळाली. यानुसार, डॉ. सिंग यांनी ऑक्सफर्डच्या नफिल्ड महाविद्यालयातून 1962 मध्ये डी. फील पूर्ण केले होते. तसेच त्यांनी 1957 साली केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात फर्स्ट क्लास ऑनर्स डिग्री प्राप्त केली होती.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने डॉ. सिंग यांच्या नावे स्कॉलरशीप दिली नाही तर मग कोणी दिली?

दोन वेळा पंतप्रधान राहिलेल्या डॉ. सिंग यांचा कार्यकाळ संपला तेव्हा हिंदुस्थान टाईम्सने 16 मे 2014 रोजी एक बातमी प्रसिद्ध केली होती. यामध्ये केम्ब्रिज विद्यापीठाने आपल्या या माजी विद्यार्थ्याचा अभिमान असल्याचे सांगितले होते. या बातमीत म्हटले की, केम्ब्रिज विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सेंट जॉन्स कॉलेजमध्ये डॉ. मनमोहन सिंग शिष्यवृत्ती देण्यात येते.

मूळ बातमी येथे वाचा – हिंदुस्थान टाईम्सअर्काइव्ह

सेंट जॉन्स कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवर या डॉ. मनमोहन सिंग स्कॉलरशिपबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, या महाविद्यालयात विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्रांमध्ये एम. फील आणि पीएच.डी करण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना 2007 पासून ही शिष्यवृत्ती देण्यात येते. यामध्ये कोर्स फी, विमानाचे भाडे, यूके व्हिसा, मासिक स्टायपेंड मिळते. हे महाविद्यालय केम्ब्रिज विद्यापीठाअंतर्गत येते. याचा अर्थ की, मनमोहन सिंग यांच्या नावे केम्ब्रिज विदयापीठात शिष्यवृत्ती देण्यात येते.

मूळ वेबसाईटला येथे भेट द्या – St. John’s College

निष्कर्ष

डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावे ऑक्सफर्ड विद्यापीठाने स्कॉलरशिप सुरू केलेली नाही. इंग्लंडमधीलच केम्ब्रिज विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सेंट जॉन्स कॉलेजमध्ये डॉ. मनमोहन सिंग स्कॉलरशिप देण्यात येते. ही शिष्यवृत्ती 2007 पासून सुरू आहे.

Avatar

Title:ऑक्सफर्ड विद्यापीठाने मनमोहन सिंग यांच्या नावे स्कॉलरशीप सुरू केली आहे का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False