प्लॅस्टिकचा तांदूळ तयार करतानाचा व्हिडियो फेक आहे. पाहा सत्य

False आरोग्य
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ ही गंभीर समस्या आहे. सणासुदीच्या काळात तर हे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. सध्या सोशल मीडियावर पसरत असलेल्या व्हिडियोला खरे मानले तर आता तांदळामध्येसुद्धा भेसळ होत आहे. या व्हिडियोमध्ये प्लास्टिकचा तांदूळ कसा तयार केल जातो हे दाखविले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅपद्वारे (9049043487) पाठवून पडताळणी करण्याची विनंती केली.

मूळ पोस्ट आणि व्हिडियो येथे पाहा – फेसबुकव्हिडियो

काय आहे व्हिडियोमध्ये?

सुमारे दोन मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये एक व्यक्ती प्लॅस्टिकच्या पिशव्या एका मशीनमध्ये टाकतो. मग हे मशीन प्लॅस्टिकला वितळवून लगदा तयार करते आणि नंतर तांदळासारख्या दाण्यामध्ये रुपांतरित करते. दावा केला जात आहे की, प्लॅस्टिकचा तांदूळ कसा तयार केला जातो हे दाखविणारा हा व्हिडियो आहे. पोस्टकर्त्याने लिहिले की, शेतकऱ्याला आता भाताच बी घेऊन भात शेती करायची गरज नाही…कारण आता तांदूळ आसा येतोय खाण्यासाठी.

तथ्य पडताळणी

सदरील व्हिडियोतील की-फ्रेम्सला यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर अनेकांनी हा व्हिडियो शेयर केल्याचे आढळले. परंतु, सिना नावाच्या एका चीनी भाषेतील वेबसाईटवरील 2017 मधील लेखानुसार, सदरील व्हिडियोमध्ये प्लॅस्टिकला रिसायकल (पुनर्प्रक्रिया) करण्याची पद्धत दाखविण्यात आली आहे. गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने भाषांतर केले असता कळते की, हा व्हिडियो अनेक वर्षांपासून प्लॅस्टिकचे तांदूळ म्हणून पसरत आहे. परंतु, चीनमधील प्लॅस्टिक इंडस्ट्रीने हा दावा खोटा असल्याचे सांगितले. 

मूळ लेख येथे पाहा – Sinaअर्काइव्ह

सदरील व्हिडियो प्लॅस्टिकची पुनर्प्रकिया करण्याचा आहे. प्लॅस्टिक निर्मिती क्षेत्रात ही फार कॉमन पद्धत आहे. ग्रॅन्युएलर मशीनद्वारे प्लॅस्टिकला रिसायकल करून दाणे तयार करण्यात येते. हे दाणे मग पुन्हा प्लॅस्टिकची उत्पादने तयार करण्यासाठी वापरण्यात येतात. साठवणूक आणि वाहतूकीसाठी सोपे जावे म्हणून असे प्लॅस्टिकचे दाणे तयार केले जातात. गुगलवर प्लॅस्टिक ग्रॅन्युएलर असे सर्च केल्यावर असे अनेक व्हिडियो समोर येतात. असाच एक व्हिडियो खाली पाहू शकता. यामध्ये स्पष्ट होते की, जून्या प्लॅस्टिकला मशीनद्वारे दाण्यांमध्ये रुपांतरित केले जाते. हे दाणे तांदळासारखेच दिसतात.

प्लॅस्टिकच्या तांदळाचे रहस्य!

प्लॅस्टिकचे तांदूळ बाजारात विक्री होत असल्याच्या अफवा अनेक वर्षांपासून जगभरात पसरलेल्या आहेत. बीबीसी आणि द हिंदुच्या बातमीनुसार, 2010 साली सर्वप्रथम प्लॅस्टिकच्या तांदळाची बातमी समोर आली होती. चीनमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या वुचँग तांदळाच्या नावाखाली साधा आणि भेसळयुक्त तांदूळ विक्रीचा घोटाळा उघडकीस आला होता. बटाटे, रताळे आणि प्लॅस्टिकपासून हा भेसळयुक्त तांदूळ तयार केला जात असल्याचे वृत्त कोरियन टाईम्सने दिले होते. तेव्हापासून “प्लॅस्टिक राईस”चा उगम झाला. तेव्हापासून आजतयागत प्लॅस्टकचा तांदूळ म्हणून अनेक व्हिडियोज समोर आले. परंतु, सर्व खोटे निघाले. आतापर्यंत प्लॅस्टिकच्या तांदळाचे कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. तसेही, अनेक तज्ञांच्या मते प्लॅस्टिकचा तांदूळ तयार करणे अत्यंत खर्चिक काम आहे. त्याचा दर नैसर्गिक तांदळापेक्षा कैकपटीने अधिक असेल.

मूळ बातमी येथे वाचा – बीबीसीअर्काइव्हद हिंदूअर्काइव्ह

भारतात प्लॅस्टिकचा तांदूळ आहे का?

2017 मध्ये, हैदराबाद आणि सिंकदराबाद येथील हॉटेल्समध्ये प्लॅस्टिकचा तांदूळ वापरला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. तेलंगणा नागरी पुरवठा विभागाकडे अशाप्रकारच्या तक्रारींचा ओघ वाढल्याने या संशयास्पद तांदळाचे तपासणीसाठी नमुनेदेखील गोळा करण्यात आले होते. त्याआधी 2015 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात प्लॅस्टिक तांदळाविरोधी जनहित याचिकासुद्धा दाखल करण्यात आली होती. चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या तांदळामध्ये प्लॅस्टिकच्या तांदळाची भेसळ करण्यात येत असल्याचा आरोप करीत तपासणी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. परंतु, आजपर्यंत भारतात प्लॅस्टिक तांदूळ सापडलेला नाही.

प्लॅस्टिकचा तांदूळ : एक अफवा

देशभराती प्लॅस्टिकच्या तांदळावरून लोकांमध्ये भीती पसरल्याने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) या प्रकराणात लक्ष घातले. ‘एफएसएसआय’ने  नुमन्यांची तपासणी करून निर्वाळा दिला की, सोशल मीडियावर पसरत असलेले प्लॅस्टिक राईसचे दावे पूर्णतः चुकीचे आहेत. 20 जून 2019 रोजी ‘एफएसएसआय’ने तशी नोटीसच प्रसिद्ध केली. यामध्ये म्हटले की, शंकास्पद तांदळाची कोहिमा येथील प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. सदरील नमुने पूर्णतः नैसर्गिक असून त्यामध्ये प्लॅस्टिक आढळले नाही. ‘एफएसएसआय’च्या अधिकृत वेबसाईटवरदेखील याविषयी स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

मूळ नोटीस येथे वाचा – FSSAIअर्काइव्ह

हाँगकाँगच्या अन्न सुरक्षा केंद्रानेसुद्धा (Centre for Food Safety) यासंबंधी चौकशी करून 2017 साली “प्लॅस्टिक तांदळाचा दावा खोटा असल्याचा” अहवाल दिला होता. The Authenticity of Alleged “Fake” Rice असे या अहवालाचे नाव होते. स्नोप्स आणि ऑब्जर्व्हर्स फ्रान्स 24 यांनीसुद्धा हा प्लॅस्टिक राईसची अफवा असल्याचे म्हटले आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, सदरील व्हिडियो प्लॅस्टिकचा तांदूळ तयार करण्याचा नाही. प्लॅस्टिक रिसायकल (पुनर्प्रक्रिया) करून त्याचे कसे दाणे तयार केले जातात, हे दाखवणारा हा व्हिडियो आहे. आतापर्यंत प्लॅस्टिकचा तांदूळ सापडल्याची एकही घटना समोर आलेली नसून, केवळ अफवा पसरविल्या गेलेल्या आहेत.

Avatar

Title: प्लॅस्टिकचा तांदूळ तयार करतानाचा व्हिडियो फेक आहे. पाहा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •