पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील नौपारा महिषासुर नामक रेल्वे स्थानकाची तोडफोड झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, रेल्वे हॉर्नच्या आवाजाने नमाजमध्ये व्यत्यय येत असल्याने काही लोकांनी ही तोडफोड करण्यात आली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ सीएए आंदोलनातील असून, जुना व्हिडिओ चुकीच्या माहितीसह शेअर केला जात आहे.

काय आहे दावा ?

लहान मुले रेल्वेस्थानकामध्ये दगडफेक करतानाचा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील नौपारा महिषाशूर रेल्वे स्टेशनची संपूर्ण तोडफोड करण्यात आली. कारण रेल्वेच्या शिट्ट्याचा आवाज त्यांच्या नमाजात व्यत्यय आणत होता. गुंडांचे वयोगट पहा, मदरशांचे उत्पादन? तुम्ही बंगालचे तसेच भारताचे भविष्य पाहू शकता का? विचार करा आणि मत द्या.”

Archive

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओ संबंधित कीवर्ड सर्च केल्यावर रिया दे नावाच्या युजरने 15 डिसेंबर 2019 रोजी या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केल्याचे आढळले. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “नौपारा महिषासुर रेल्वे स्थानक, ही लहान मुलं आता शाळेत जाण्यापूर्वी हे सगळं करत आहेत.”

खालील व्हिडिओमध्ये रेल्वे स्थाकावर ‘नौपारा महिषासुर’ नाव आपण पाहू शकतो.

https://www.facebook.com/100027652415900/videos/462141168050960/?__tn__=%2CO-R

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर सापडले की, वाइल्ड फिल्म्स इंडियाच्या या युट्यूब चॅनेलने 18 नोव्हेंबर 2020 रोजी एक व्हिडिओ प्रसारित केला होता. यामध्ये 0.26 मिनिटांपासून पुढे व्हायरल क्लिपमधील दृश्य दिसतात.

व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये CAA आणि NRC विरोधात देशाभरात आंदोलन सुरू असताना पश्चिम बंगालमध्ये ‘नौपारा महिषासुर’ रेल्वे स्थानकाची तोडफोड करण्यात आली होती.

https://www.youtube.com/watch?v=qcs9lxgF-c8

काय आहे प्रकरण ?

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) हे दोन्ही वादग्रस्त कायद्यांवरून 2019 साली देशभरात असंतोषाचे वातावरण पसरले होते. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील विविध भागात विरोध प्रदर्शने झाली होती. वर्तमान पत्रिकाच्या बातमीनुसार विरोधाची तीव्रता जंगीपूरमध्ये सर्वाधिक होती. काही आंदोलकांनी निमतिता स्थानक, पोरडांगा स्थानक आणि नौपारा महिषासुर स्थानकावर तोडफोड केली होती.

परंतु, रेल्वेच्या आवाजाने नमाज अदा करण्यात व्यत्यय येत असल्याने लोकांनी रेल्वे स्थानकामध्ये तोडफोड करण्यात आली, असे कुठेच आढळले नाही.

नौपारा महिषासुर जंगीपुरच्या सागरदिघी पोलीस ठाण्याअंतर्गत येते.

फॅक्ट क्रेसेंडोने जंगीपूर पोलीस उपअधीक्षक (एसडीपी) विद्युत तरफदार यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी सांगितले की, “व्हायरल व्हिडिओ 2019 सालचा आहे. रेल्वेच्या आवाजाने नमाज अदा करण्यात व्यत्यय येत असल्याने नौपारा महिषासुर रेल्वे स्थानकाची तोडफोड करण्यात आली, हा दावा खोटा आहे. तसेच अलीकडच्या काळातदेखील रेल्वे स्थानकावर दगडफेक झालेली नाही.”

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओसोबत केला जाणारा दावा खोटा आहे. ही घटना 2019 मध्ये सीएए व एनआरसी विरोधातील आंदोलनादरम्यान घडली होती. भ्रामक दाव्यासह जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:पश्चिम बंगालमधील रेल्वे स्थानकावरील तोडफोडीचा जुना व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: False