चीनने भारतात आरोग्याला धोकादायक असणारे फटाके पाठवल्याचा गृहमंत्रालयाने इशारा दिला का?

राष्ट्रीय

एका व्हायरल मेसेजमध्ये गृह मंत्रालयाचा दाखला देत म्हटले आहे की, पाकिस्तानच्या सांगण्यावरून चीनने भारतात आरोग्याला धोकादायक असणारे फटाके पाठविले आहेत. दमा आणि डोळ्यांचे आजार होऊ शकतील असे विषारी वायू या फटक्यांमध्ये असल्यामुळे ते न खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, हा मेसेज खोटा आहे.

काय आहे दावा?

व्हायरल मेसेजमध्ये गृह मंत्रालयातील कोणी वरिष्ठ तपास अधिकारी विश्वजित मुखर्जी यांच्या नावाने म्हटले की, “गुप्तचरानुसार, पाकिस्तान भारतावर थेट हल्ला करू शकत नसल्याने त्याने भारताकडून बदला घेण्याची मागणी चीनकडे केली आहे. भारतात दमा पसरवण्यासाठी चीनने विशेष प्रकारचे फटाके भरले आहेत, जे कार्बन मोनोऑक्साईड वायूला विषारी आहेत. याशिवाय, भारतात, डोळ्यांच्या आजारांच्या विकासासाठी विशेष प्रकाश सजावटीचे दिवे देखील तयार केले जात आहेत. पारो मोठ्या प्रमाणात वापरला गेला आहे, कृपया या दिवाळीत जागरूक रहा आणि या चायनीज उत्पादनांचा वापर करू नका. हा संदेश सर्व भारतीयांपर्यंत पोहोचवा.”

मूळ पोस्ट – फेसुबकफेसबुक

तथ्य पडताळणी

गृहमंत्रालयाने खरंच असे आवाहन केले का याचा शोध घेतला. परंतु, अशी बातमी आढळली नाही. 

गृह मंत्रालयाची वेबसाईट आणि ट्विटर हँडलवरदेखील असा काही मेसेज किंवा त्यासंबंधीचे कोणतेही पत्र अथवा सूचना उपलब्ध नाही.

यानंतर अधिक शोध घेतल्यावर पीआयबीतर्फे या मेसेजविषयीचा एक खुलासा आढळला. यामध्ये या व्हायरल मेसेजला खोटे म्हटले आहे.

‘गृह मंत्रालयाच्या नावाने चीनी फटाक्यांवर बहिष्कार घालण्याचा एक फेक मेसेज व्हायरल होत आहे. मंत्रालयातर्फे असा कोणताही मेसेज जारी करण्यात आलेला नाही’, असे याट्विटमध्ये म्हटले आहे.

विशेष म्हणजे हा मेसेजे गेली अनेक वर्षांपासून फिरत आहे. गेल्या वर्षीदेखील दिवाळीच्या आसपास हा मेसेज शेअर केला जात होता. तेव्हादेखील पीआयबीने याबाबत ट्विट करून खुलासा केला होता.

चीनी फटाक्यांवर बंदी?

2016 साली दिल्ली उच्च न्यायालयाने चीनी बनावटीच्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली होती. या फटाक्यांमध्ये पोटॅशिअम क्लोरेट हे रसायन वापरण्यात येते. हे अत्यंत ज्वालाशील आणि आरोग्याला घातक रसायन आहे. पोटॅशिअम क्लोरेट असणाऱ्या फटाक्यांवर तशी भारतात 1992 पासून बंदी घालण्यात आलेली आहे. 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, चीनी फटाक्यांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारा तो मेसेज गृह मंत्रालयाने जारी केलेले नाही. तो मेसेज खोटा आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:चीनने भारतात आरोग्याला धोकादायक असणारे फटाके पाठवल्याचा गृहमंत्रालयाने इशारा दिला का?

Written By: Agastya Deokar 

Result: False


Leave a Reply