
नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला सुरुवात होताच राज्यपालांच्या नियुक्तीविषयी विविध दावे सोशल मीडियावर केले जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने नुकतेच सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्त झाल्याची बातमी खोटी असल्याचे समोर आणले होते. आता पुद्दुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. अनेकांनी हे खरे मानून शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?
5 जून रोजी करण्यात आलेल्या पोस्टमध्ये दावा करण्यात आला की, डॉ. किरण बेदी यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ट्विटरवरदेखील ही माहिती मोठ्या प्रमाणात पसरविली जात आहे.
तथ्य पडताळणी
गुगलवर जेव्हा या बातमीचा शोध घेतला तेव्हा अशी कोणतीही माहिती समोर आली नाही. राज्यपालांची नियुक्ती आणि त्यातल्या त्यात जम्मू-काश्मीरसारख्या संवेदनशील राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती होणे ही मोठी बातमी ठरेल. सर्व मीडिया वेबसाईटवर ती प्रसिद्ध केली जाईल. परंतु, अद्याप 5 जून दुपारी एक वाजेपर्यंत अशी कोणतीही बातमी उपलब्ध नाही.
किरण बेदी यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरदेखील या संदर्भात कोणतीही माहिती नाही. शपथग्रहण सोहळ्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची 1 जून रोजी भेट घेतल्याचे फोटो त्यांनी ट्विट केलेले आहेत. परंतु, येथे त्यांच्या जम्मू-काश्मीरच्या राज्यपाल होण्याविषयी ट्विट केलेले नाही. त्यांच्या या भेटीची ANI या वृत्तसंस्थेने बातमी दिली आहे. यानुसार, किरण बेदी यांच्यासह नागालँड आणि जम्मू-काश्मीरचे राज्यपाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

मूळ बातमी येथे वाचा – ANI । अर्काइव्ह
झी न्यूज मराठीने 3 जून रोजी दिलेल्या बातमीत किरण बेदी जम्मू-काश्मीरच्या नव्या राज्यपाल होण्याची शक्यता वर्तविली होती. पंतप्रधानांना भेट दिल्यानंतर या चर्चेला उधाण आले होते. सुत्रांच्या हवाल्याने बातमीत म्हटले की, भाजप आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) यांचे सरकार बरखास्त झाल्यानंतर काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. यानंतर काश्मीरमधील राजकीय आणि सामाजिक वातावरणात सातत्याने तणाव आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सत्यपाल मलिक यांच्याजागी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी किरण बेदी यांची नियुक्ती होऊ शकते. बातमीत शक्यता म्हटले आहे.

मूळ बातमी येथे वाचा – झी न्यूज मराठी । अर्काइव्ह
किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी 22 मे 2016 रोजी नियुक्ती करण्यात आली होती. सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे विद्यमान राज्यपाल आहेत. त्यांची बिहारचे राज्यपालपदावरून 21 ऑगस्ट 2018 रोजी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली होती.
राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करीत असतात. राष्ट्रपती कार्यालयाकडूनच अशा नियुक्तीची सर्वप्रथम माहिती देण्यात येते. राष्ट्रपती भवनाच्या वेबसाईटवर किरण बेदी यांच्या नियुक्तीचे पत्र प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. राज्यपालांच्या नियुक्तींसंदर्भात आम्ही शोध घेतला असता, राष्ट्रपतींनी शेवटची नियुक्ती 21 ऑगस्ट 2018 रोजी केली होती. त्यावेळी सात जणांची राज्यपाल म्हणून नियुक्ती केली होती.

मूळ वेबसाईटला येथे भेट द्या – राष्ट्रपती कार्यालय प्रेस रिलीज
निष्कर्ष
किरण बेदी यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेली नसून, राष्ट्रपती कार्यालयातर्फे अद्याप अशी अधिकृत माहिती पाच जून दुपारी एक वाजेपर्यंत देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही पोस्ट असत्य ठरते.

Title:FACT CHECK: किरण बेदी यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
