नाशिक/जालना रेल्वेस्थानकावर 500 किलो कुत्र्याचे मांस पकडल्याची अफवा पसरतेय. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा.

False सामाजिक

नाशिक आणि जालना रेल्वेस्थानकावर कुत्र्याचे मांस सापडल्याचे खळबळजनक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरविले जात आहेत. नाशिक रोड/जालना येथे रेल्वे सुरक्षा बलाने तब्बल थोडेथोडके नाही तर 500 किलो कुत्र्याचे मांस पकडले, असे मेसेजमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या अनेक वाचकांनी हे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून याची सत्य पडताळणी करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर शोध घेतल्यावर ही निव्वळ अफवा असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

सोशल मीडियावरील मेसेजेमध्ये म्हटले की, “नाशिकरोड स्टेशनमध्ये आज किलो कुत्रा मांस जप्त केले. हे सर्व ढाबा रेस्टॉरंट्स आणि हॉटेलसाठी दररोज आधारीत होते. मुंबई, नवी मुंबई, व इतर भागात देखील पुरवठा होतो रेस्टॉरंट यादी लवकरच बाहेर होईल. कृपया मांसाहारी अन्न टाळा…”

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

एवढ्या मोठ्या प्रमाणात कुत्र्याचे मांस सापडणे ही मोठी बातमी आहे. गुगलवर याबाबत सर्च केल्यावर मात्र अशाप्रकारची बातमी आढळून आली नाही. त्यामुळे मेसेजमधील फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केले. प्राप्त झालेल्या परिणामांमध्ये दैनिक भास्करची 19 नोव्हेंबर 2018 एक बातमी समोर आली. मेसेजमधील फोटो या बातमीत आहे. 

त्यानुसार, तमिळनाडूमधील चेन्नई एग्मोर रेल्वेस्थानकावर 17 नोव्हेंबर 2018 रोजी सुमारे 1100 किलो कथित कुत्र्याचे मांस जप्त करण्यात आले होते. जोधपूर-मन्नारगुड़ी एक्सप्रेस रेल्वेतून हे मांस नेत असताना खूप दुर्गंधी सुटल्याने आरपीएफने तपासणी केली होती. थर्मकॉलच्या 11 बॉक्सेसमधून हे मांस नेले जात होते. ते घेऊन जाणाऱ्या लोकांची चौकशी करण्यापूर्वीच ते पळून गेले होते. अन्न व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेले मांस तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते.

मूळ बातमी येथे वाचा – भास्करटाईम्स ऑफ इंडियाझी न्यूज मराठी

ते कुत्र्याचे मांस नव्हते

प्रयोगशाळेतील तपासणीत मात्र चेन्नई रेल्वेस्थानकावर जप्त करण्यात आलेल ते कुत्र्याचे मांस नव्हते, असे स्पष्ट झाले होते. तमिळनाडू पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान विद्यापीठाने पाच दिवसांनी दिलेल्या अहवालानुसार, जप्त करण्यात आलेले मांस बकऱ्याचे होते. अन्नसुरक्षा विभागानेसुद्धा हे मान्य करीत सांगितले की, रेल्वेमध्ये कुत्र्यांचे मांस नव्हते. मात्र, हे मांस नेत असताना योग्य ती काळजी घेतली गेली नव्हती.

मूळ न्यूज येथे वाचा – न्यूज मिनटइंडिया टाईम्स

फॅक्ट क्रेसेंडोने नाशिक रेल्वे पोलीस ठाण्याशी संपर्क केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “नाशिक रोड रेल्वेस्टेशनवर 500 कुत्र्याचे मांस सापडलेले नाही. सोशल मीडियावर ही अफवा पसरविली जात आहे. यावर विश्वास ठेवू नये.”

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, नाशिक किंवा जालना रेल्वेस्थानकावर कुत्र्याचे मांस सापडलेले नाही. सदरील बातमी आणि फोटो गेल्या वर्षी चेन्नई येथील घटनेचे आहेत. तेथे कुत्र्यांचे मांस म्हणून 1100 किलो मांस जप्त करण्यात आले होते. मात्र, तपासणीत ते बकऱ्याचे मांस असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वाचकांनी या अफवेवर विश्वास ठेवू नये आणि ती पसरवू नये.

Avatar

Title:नाशिक/जालना रेल्वेस्थानकावर 500 किलो कुत्र्याचे मांस पकडल्याची अफवा पसरतेय. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा.

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False