‘त्या’ जुन्या वादग्रस्त व्हिडियोतील माजी आमदाराला भाजपने उमेदवारी दिली का? वाचा सत्य

Mixture राजकीय | Political

एका माजी आमदाराने पोलिसांना अत्यंत अर्वाच्य भाषेतून शिवी दिल्याचा व्हिडियो समोर आला आहे. दावा केला जात आहे की, या आमदाराला भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली आहे.

परभणी जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सुमारे 25 वर्षे आमदार राहिलेल्या रामप्रसाद बोर्डीकर यांनी भरसभेत पोलिसांना शिवी दिल्याचा व्हिडियो व्हायरल होत आहे. या व्हिडियोवरून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचे मागणी केली तर, अनेकांनी त्यांना जिंतुर-सेलू मतदरासंघातून उमेदवारी दिली म्हणून भाजपवर टीका केली आहे. 

फेसबुकवरील व्हायरल क्लिपमध्ये माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर सभेच्या स्टेजवरून वाहने हटविण्याऱ्या पोलिसांना शिवी देऊन तसे न करण्यास सांगतात. पोस्टमध्ये लिहिले की, बघा भाजप उमेदवार बोर्डीकर. याला काय लाज आहे का? बघा प्रशासनाला शिव्या देतोय. बोर्डीकरला पाडा

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेजमध्ये म्हटले की, सभेला गर्दी दिसावी म्हणून भाडोत्री आणलेले भुरटेपण पण जोरात शिट्या वाजवतात. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा! मी माझ्या पोलीस बांधवांना जाहीर आवाहन करतो की, हे जिथे कशात सापडतील त्यात व्याजासकट वसुल करा. अनेकांनी या व्हिडियोखाली कमेंट करून हे राष्ट्रवादीचे नेते म्हटले तर, इतरांनी हा व्हिडियो जुना असल्याचे सांगितले. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोचे आणि संपूर्ण प्रकराणाचे सत्य शोधले आहे.

तथ्य पडताळणी

रामप्रसाद बोर्डीकर काँग्रेस पक्षातर्फे जिंतुर-सेलू मतदारसंघातून 25 वर्षे आमदार होते. सध्या ते हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. त्यांनी असे वादग्रस्त भाष्य कधी केले याचा शोध घेतला. तेव्हा कळाले की, हा व्हिडियो गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीसुद्धा व्हायरल झाला होता. त्यापूर्वी डिसेंबर 2018 मध्येसुद्धा सोशल मीडियावर ही क्लिप पसरली होती. याचा अर्थ ही क्लिप सध्या सुरू असलेल्या प्रचारसभेतील नाही. 

सरकारनामा वेबसाईटवरील 14 डिसेंबर 2018 रोजीच्या बातमीनुसार, ही व्हिडियो क्लिप पाच वर्षांपूर्वीची आहे. बोर्डीकर जेव्हा काँग्रेसचे आमदार होते तेव्हा जानेवारी 2014 मध्ये त्यांनी महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी मोर्चाला संबोधित केले. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या लोकांना जिंतूर रस्त्यावरील एका जागेत वाहने उभी करण्यासाठी जागा देण्यात आली होती. येथे उभ्या असलेल्या वाहनांवर गाड्यांवर दगडफेक झाल्याची अफवा सभेच्या ठिकाणी पसरली. त्यामुळे संतापलेल्या बोर्डीकरांनी भाषणातूनच पोलिसांना उद्देशून असभ्य भाषा वापरली होती.

मूळ बातमी येथे वाचा – लोकसत्ताअर्काइव्ह

हा धागा पकडून अधिक शोध घेतल्यावर ‘लोकसत्ता’ची 20 जानेवारी 2014 रोजीची एक बातमी आढळली. यामध्ये स्पष्ट म्हटले होते की, याप्रकरणी आमदार बोर्डीकरांविरुद्ध कलम 294, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्याविरोधात जमादार सय्यद जाफर सय्यद महेबूब यांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

विशेष म्हणजे रामप्रसाद बोर्डीकर यांची ही वादग्रस्त क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतः समोर येऊन खुलासा केला होता की, हा व्हिडियो चार वर्षापूर्वींचा आहे. हा व्हिडियो पुन्हा कोणी शेयर करू नये. तसे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इशारा दिला होता.

मूळ बातमी येथे वाचा – सरकारनामाअर्काइव्ह

यावरून हे स्पष्ट झाले की, रामप्रसाद बोर्डीकरांची ही वादग्रस्त क्लिप जूनी आहे. 2014 साली जेव्हा ते काँग्रेसचे आमदार होते तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केले होते. 

1990 पासून बोर्डीकर काँग्रेसच्या तिकिटावर सातत्याने आमदार म्हणून निवडून आले. चार वेळा विधानसभेत व एकदा विधान परिषदेचे सदस्य राहिलेल्या बोर्डीकरांचा 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार विजय भांबळे यांच्याकडून पराभव झाला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. अखेर दोन वर्षांनी त्यांनी अधिकृतरीत्या 2017 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

मग भाजपने यंदा त्यांना उमेदवारी दिली का?

सोशल मीडियावर या व्हिडियोतून दावा केला जातोय की, रामप्रसाद बोर्डीकर यांना भाजपतर्फे जिंतुर-सेलुतून आमदारकीचे तिकीट देण्यात आले. मात्र, ते चूक आहे. त्यांच्या कन्या मेघना साकोरे – बोर्डीकर यांना या मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळालेली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, मेघना बोर्डीकर भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत. मेघना यांच्या फेसबुक पेजवरून उमेदवारी अर्ज दाखल करताना फोटो शेयर करण्यात आला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता.

मूळ पोस्ट येथे पाहा –  फेसबुक

एबीपी-माझा वाहिनीने रामप्रसाद बोर्डीकर व त्यांच्या कन्या मेघना यांची 11 ऑक्टोबर मुलाखत घेतली होती. यामध्ये त्यांनी मुलीसाठी यंदा आमदरकीची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

फॅक्ट क्रेसेंडोने मेघना साकोरे – बोर्डीकर यांच्याशी थेट संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, सदरील व्हिडियो जूना असून, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पोलिसांनीसुद्धा हा व्हिडियो सोशल मीडियावर शेयर न करण्याचे आवाहन केलेले आहे. तसेच, जिंतुर-सेलू मतदारसंघातून भाजपतर्फे मी निवडणुकीसाठी उभी आहे. माझे वडील नाही.

निष्कर्ष

माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी पोलिसांना उद्देशून अपशब्द वापरल्याचा व्हिडियो 2014 मधील आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच, यंदाच्या विधानसभा निवडणूकीत भाजपने त्यांना तिकीट दिलेले नाही. जिंतुर-सेलू मतदारसंघातून मेघना साकोरे – बोर्डीकर भाजपच्या उमेदवार आहेत.

Avatar

Title:‘त्या’ जुन्या वादग्रस्त व्हिडियोतील माजी आमदाराला भाजपने उमेदवारी दिली का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Mixture