
कोरोना विषाणूची जागितक साथ पसरल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. यात भर म्हणून सोशल मीडियावर अनेक चुकीचे दावे पसरविले जात आहेत. अशाच एका व्हायरल पोस्टमध्ये काही पोलिस रेल्वेत घुसून लोकांना मारत असल्याचे दिसते. सोबत दावा केला जात आहे की, कोरोना व्हायरसमुळे चीमध्ये परिस्थिती इतकी गंभीर आहे की, पोलिस अशा प्रकारे संशयितांना पकडत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा दावा खोटा आढळला.
काय आहे पोस्टमध्ये?
व्हायरल व्हिडियोमध्ये गणवेशधारी पोलिस एका रेल्वेत घुसून लोकांना मारीत आहेत. त्यांना जमिनीवर पाडून अटक करीत आहेत. भेदरलेले लोक एकमेकांना मिठी मारून बसलेले आहेत. सोबत लिहिले की, कोरोना हा आपल्याला गम्मत वाटते ना? बघा चिन मध्ये त्याची दहशत.
फेसबुकवर हा व्हिडियो मोठ्या प्रमाणावर शेयर केला जात आहे.
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । फेसबुक । फेसबुक । फेसबुक । फेसबुक
तथ्य पडताळणी
हा व्हिडियो नेमका कुठला आहे हे तपासण्यासाठी सर्वप्रथम की-फ्रेम्स निवडूण रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की हा व्हिडियो चीनमधील नाही. हा व्हिडियो हाँगमधील आहे.
बीबीसी आणि गार्डियनने दिलेल्या बातमीनुसार, हाँगकाँगमधील गुन्हेगारांचे चीनमध्ये प्रत्यार्पण करण्याबाबतच्या विधेयकाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान तेथील दंगाविरोधी पथकाने एका मेट्रो स्टेनशमध्ये घुसून लोकांवर कारवाई केली होती. पोलिसांच्या मते आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर काही आंदोलक स्टेशनमध्ये घुसले होते. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली होती.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने हा व्हिडियो 31 ऑगस्ट 2019 रोजी युट्यूबवर अपलोड केला होता. कोरोना व्हायरसची साथ डिसेंबर 2019 पासून सुरूवात झाली.
नवा कायदा परत घ्या म्हणून हाँगकाँगमधील नागरिक सरकारविरोधात गेल्या कित्येक महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. 31 ऑगस्ट 2019 रोजी आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे मोंग कोक और प्रिंस एडवर्ड एमटीआर स्टेशनवरती गर्दी जमा झाली. त्यानंतर पोलिसांनी मेट्रो स्टेशनमध्ये घुसून लोकांना अटक केली होती.
हाँगकाँग फ्री प्रेसनेदेखील हा व्हिडियो शेयर केला होता.
निष्कर्ष
यावरून हे सिद्ध होते की, रेल्वेत घुसून पोलिस कारवाई करीत असलेला व्हिडियो चीनमधील नाही. तो व्हिडियो हाँगकाँगमधील आहे. त्याचा कोरोना व्हायरसशी काही संबंध नाही. सरकारविरोधी आंदोलनामधील हा व्हिडियो आहे.

Title:हाँगकाँगमधील सरकारविरोधी आंदोलनाचा जुना व्हिडियो चीनमधील कोरोनाचा परिणाम म्हणून व्हायरल.
Fact Check By: Agastya DeokarResult: False
