CoronaVirus: हात धुण्यासाठी तुरटीचा वापर सॅनिटायझरपेक्षा प्रभावशाली आहे का?

Coronavirus Medical Partly False

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला आहे. हात धुण्यासाठी अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर्स किंवा साबणाचा पर्याय WHO ने सुचविला आहे. परंतु, सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, हात धुण्यासाठी सॅनिटायझरपेक्षा तुरटी जास्त प्रभावशाली आहे. तुरटीच्या मुळे कोणताही विषाणू अंगावर राहत नसल्याचे या व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडो या दाव्याची पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये? 

कस्तुरबा हॉस्पीटलच्या डॉ. पद्मजा केसरकर यांच्या नावे फिरणाऱ्या पोस्टचा सार असा- कोरोनाच्या संसर्गामुळे सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. पण सॅनिटायझरपेक्षा पारंपरिक तुरटी किती तरी फ़ायदेशीर आहे. तुरटीचा हात धुताना किंवा स्नान करताना पाण्यामध्ये उपयोग केल्यास कोणता ही विषाणु तुमच्या शरीरावर जगू शकत नाही. तुरटी टाकून गरम पाणी सोबत गुळना केल्यास गळ्यातील व तोंडातील विषाणू नाहीसे होतात.

Corona Turti.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

सध्या खोट्या माहितीचा उहापोह असताना कोरोना विषाणू विषयक खात्रीलायक आणि तथ्य पूर्ण माहिती केवळ जागतिक आरोग्य संघटनेतर्फे देण्यात येते. WHO मार्गदर्शनाखालीच जगभर कोरोनाला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कोरोनापासून बचावाचा उपाय म्हणून हात धुण्याविषयी WHO ने काही पद्धती दिलेल्या आहेत.

त्यानुसार, हात धुण्यासाठी अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर किंवा साबण वापरावा असे सांगितले आहे. यामध्ये तुरटीचा (Alum) उल्लेख नाही. 

mythbusters-27.png

सविस्तर येथे वाचा – WHO Hand Hygiene | Myth Busters

इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी कोरोनाविषयक विविध भ्रामक आणि गैरसमजुतींबद्दल माहिती दिली होती. सॅनिटाजरऐवजी तुरटीचा वापर यासह विविध दाव्यांविषयी ते म्हणाले होते की, “ही पोस्ट तद्दन खोटी आणि जनतेला संभ्रमित करणारी आहे. अशा संदेशामुळे लोक शास्त्रीयदृष्ट्या घ्यायची प्रतिबंधात्मक काळजी घेण्यापासून दूर राहतात. त्रास असताना वेळेवर डॉक्टरांना दाखवत नाहीत. साहजिकच ही बाब त्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकते आणि कोरोनाची साथ वेगाने फैलावते.”

screenshot-maharashtratimes.indiatimes.com-2020.03.18-14_49_04.png

मूळ बातमी येथे वाचा – महाराष्ट्र टाईम्सArchive

कोरोनाबाबत जनजागृती करणाऱ्या डॉ. रवी वानखेडकर यांच्याशी आम्ही संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, कोरोनाबाबत जगभरात वेगवेगळे संशोधन सध्या सुरु आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशाचे सध्या आपण भारतात पालन करत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने तुरटीबाबत कोणतेही निर्देश आम्हाला दिलेले नाहीत. तुरटी पाणी स्वच्छ करण्याकरता वापरण्यात येत असली तरी तुरटीमुळे विषाणू किंवा जीवाणू मरतात असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलेले नाही. 

काय आहे तुरटी?

तुरटी या नावाने सामान्यतः ओळखला जाणारा पदार्थ म्हणजे पॉटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट किंवा पोटॅश ॲलम हा होय. भारतातील लोकांना प्राचीन काळापासून तुरटीचा उपयोग कापडावर रंग पक्का बसविण्याकरिता (रंगबंधक म्हणून) करता येतो हे माहीत होते, असे उल्लेख प्राचीन संस्कृत ग्रंथांत आढळून येतात. 

तुरटीचे उपयोग?

पोटॅश तुरटीचा उपयोग  पाणी शुद्ध करण्यासाठी करतात. तुरटीच्या लाहीचा उपयोग व्रण व जखमा धुण्यासाठी, गुळण्या करण्यासाठी, बाह्योपचारात रक्तस्रावरोधी म्हणून, फेसयुक्त अग्निशामकात, तसेच उत्तर भारतात उंट व म्हशी यांच्या पिण्याच्या पाण्यात मिसळण्यासाठी इ. कामांसाठी वापरतात. सविस्तर येथे वाचा – मराठी विश्वकोश

डॉ. पद्मजा केसरकर कोण?

पोस्टमध्ये यांचे आडनाव चुकीचे दिले आहे. त्या “केसकर” आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या त्या कार्यकारी आरोग्य अधिकारी आहेत. त्यांनी सॅनिटायझर ऐवजी तुरटी वापरण्यासंबंधी कोणतीही माहिती किंवा पोस्ट केल्याचे आढळले नाही.

निष्कर्ष

याचा अर्थ की, तुरटीमध्ये काही विशिष्ट गुणधर्म असले तरी, कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्याचा प्राधान्याने उपयोग करावा असे सांगणे जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून नाही. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी अशी कोणतीही पोस्ट केलेली नाही. हात धुण्यासाठी सॅनिटायझर अथवा साबणाचा वापरच योग्य असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही पोस्ट अर्धवट माहितीच्या आधारे करण्यात आली आहे. कोरोनाविषयक माहिती केवळ अधिकृत संस्थेकडून मिळाली तरच विश्वास ठेवा.

Avatar

Title:सॅनिटायझरऐवजी तुरटीचा वापर योग्य आहे का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: Partly False