
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्यानंतर हा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये रस्त्यावर नमाज अदा करण्याविरुद्धच्या आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रस्त्यावर नमाज अदा करणे सुरू असताना फ्रेंच नागरिक त्यांचे राष्ट्रगीत गात आहेत.
मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी हा व्हिडिओ शेअर करून राज ठाकरेंच्या भूमिकेचा फ्रान्समध्ये परिणाम झाल्याचा दावा केला.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ 2017 मधील आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणामुळे फ्रेंच नागरिक सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करण्याच्या विरोधात एकवटले असे म्हणने असत्य ठरते.
काय आहे दावा?
सुमारे एका मिनिटांचा व्हिडिओ शेअर करून कॅप्शनमध्ये म्हटले की, “RAJ THACKERAY EFFECT पॅरिसमध्ये. जेव्हा मुस्लिम लोक पॅरिसच्या रस्त्यावर नमाज पठण करत होते तेव्हा फ्रेंच नागरिकांनी फ्रान्सचे राष्ट्रगीत तेवढ्याच मोठ्याने गायले. !!”
मूळ पोस्ट येथे पाहा – इन्स्टाग्राम । इन्स्टाग्राम । इन्स्टाग्राम
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे ते पाहू. कीवर्ड सर्चद्वारे कळाले की, हा व्हिडिओ गेल्या अनेक वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.
फ्रेंच भाषिक न्यूज वेबसाईटनुसार, पॅरिसमधील क्लिची नावाच्या उपनगरामधील हा व्हिडिओ आहे. तेथील उजव्या विचारसरणीच्या पक्षाचे सदस्य आणि तत्कालिन महापौर रेमी मुझिऊ यांच्या नेतृत्वामध्ये रस्त्यावर नमाज पठण करण्याविरोधात 10 नोव्हेंबर 2017 रोजी मोर्चा काढण्यात आला होता. क्लिचीमधील मुख्य चौकातील रस्त्यावर मुस्लिम समुदायातर्फे शुक्रवारी नमाज अदा करण्यात येत असे.
असोसिएटेड प्रेस वृत्तसंस्थेच्या युट्यूब चॅनेलवर या मोर्चाचा व्हिडिओ उपलब्ध आहे.
बीबीसीनेसुद्धा या आंदोलनाचे वृत्त दिले होते. फ्रान्सच्या राष्ट्रध्वजातील रंगाचे सॅशे परिधान करून सुमारे 100 राजकीय नेते रस्त्यावरील शुक्रवारच्या नमाजविरोधात या आंदोलनात सहभागी झाले होते. रस्त्यावर नमाज पठण सुरू असताना त्यांनी राष्ट्रगीत गाऊन विरोध केला.
पोलिसांचे मोठा बंदोबस्त असतानाही दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की झाली होती. शुक्रवारच्या नमाजसाठी कोणतीही जागा उपलब्ध नसल्याने नाईलाजाने रस्त्यावर पठण करावे लागते, असे स्थानिक मुस्लिमांचे म्हणने असते.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, रस्त्यावरील नमाजविरोधातील हा व्हिडिओ सुमारे पाच वर्षे जुना आहे. त्यामुळे या व्हिडिओचा राज ठाकरेंच्या भाषणाशी किंवा भूमिकेशी संबंध जोडणे संयुक्तिक तसेच तथ्यपूर्ण ठरत नाही.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:FAKE NEWS: राज ठाकरेंच्या भाषणामुळे फ्रान्समध्ये रस्त्यावर नमाज पठणास विरोध सुरू झाला का?
Fact Check By: Agastya DeokarResult: Missing Context
