
भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये जखमी झालेल्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह येथे भेट दिली होती. या भेटीवरून सोशल मीडियावर विविध प्रकारचे दावे करण्यात आले. अशाच एका व्हायरल फोटोद्वारे दावा केला जात आहे की, या भेटीदरम्यान भाजपचा नेता तजिंदरपाल सिंग बग्गा हाच जखमी सैनिक म्हणून बसला होता.
फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली असता कळाले की, हा दावा खोटा आहे.
काय आहे पोस्टमध्ये?
पोस्टमध्ये फोटोंची तुलना करण्यात आलेली आहे. एका फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी जखमी जवानांची विचारपूस करीत आहेत. तर दुसऱ्या फोटोत भाजपचा नेता तजिंदर बग्गा आहे. मोदींच्या फोटोत दिसणारा शीख जवान तजिंदर बग्गा आहे असे दर्शविण्यात आले आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कोणती पूर्वघोषणा न करता नरेंद्र मोदी यांनी 3 जुलै रोजी लेह येथील आर्मी हॉस्पिटल येथे गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या जवानांची भेट घेतली होती. या भेटीच्या फोटोंवरून अनेकांनी आरोप केले होते की, हा केवळ फोटोसाठी केलेला बनाव होता. ते आर्मी हॉस्पिटल नव्हते.
यानंतर भारतीय लष्कराने खुलासा करीत हे आरोप खोटे असल्याचे सांगितले. स्टेटमेंटमध्ये आर्मीने म्हटले की, फोटोमधील जागा आर्मी हॉस्पिटलमधील आहे. कोविड-19 मुळे काही वॉर्ड अलगीकरण कक्षांमध्ये रुपांतरित केलेले असल्यामुळे ट्रेनिंग रूममध्ये 100 खाटांची व्यवस्था करण्यात आली होती.

मूळ स्टेटमेंट येथे वाचा – PIB
तसेच मोदींच्या भेटी आधी 23 जून रोजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनीदेखील लेहच्या या आर्मी हॉस्पिटलला भेट दिली होती. गलवानमधील हिंसक चकमकीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर तेथील भारतीय कमांडर्सशी चर्चा करण्यासाठी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते.
तजिंदर बग्गा यांचे नाव या भेटीशी जोडले गेल्यानंतर बग्गा यांनी ट्विटरवर अशा युजर्सला उत्तर देत ते नसल्याचे स्पष्ट केले..
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, मोदी यांच्या लेह आर्मी हॉस्पिटल भेटी दरम्यान तजिंदर बग्गा तेथे नव्हते. हे सर्व गलवान खोऱ्यात जखमी झालेले जवान होते. मोदींच्या या भेटीवेळी पक्षाचे कोणतेही कार्यकर्ते सोबत नव्हते. त्यामुळे हा दावा असत्य ठरतो.

Title:मोदींच्या लेह भेटीदरम्यान भाजपचा नेता जखमी सैनिक म्हणून बसला होता का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
