हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावलेल्या डॉक्टरचा व्हिडिओ मुंबईचा नाही; वाचा सत्य

Partly False सामाजिक

एका हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेली महिला डॉक्टर जमिनीवर कोसळल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, ही घटना नुकतीच मुंबईतील विनायक हॉस्पिटलमध्ये घडली. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुनीता यांचाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला, असे व्हायरल मेसेजमध्ये म्हटलेले आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ पाच वर्षे जुना आणि मुंबईतील नाही. 

काय आहे दावा?

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, दोन महिला डॉक्टर एका काउंटरपाशी बोलत असताना त्यांच्यापैकी एक खाली कोसळते. लगेच आसपासचे कर्मचारी त्यांच्या मदतीसाठी धावून येतात. या व्हिडिओसोबतच्या मेसेजमध्ये म्हटलेले आहे की, “विनायक हॉस्पिटल, मुंबईचे CCTV फुटेज.  डॉक्टर सुनीता या तज्ज्ञ हृदयरोग तज्ज्ञ, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मरण पावले, चक्कर मारत असताना, तिच्या कर्मचार्‍यांना काहीही करायला वेळ मिळाला नाही. जीवनात काहीही निश्चित नाही.”

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा फोटो नेमका कधीचा आहे हे शोधले. कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ गेल्या पाच-सहा वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. व्हिडिओमधील सीसीटीव्ही फुटेजवरसुद्ध वर्ष 2017 दिसते. 

फेसबुकवर एका युजरने हाच व्हिडिओ 14 डिसेंबर 2017 रोजी शेअर केला होता. त्यासोबत लिहिले होते की, हा बंगळुरूमधील विनायक हॉस्पिटलमधील व्हिडिओ आहे.

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर न्यूज व्हिडिओ वेबसाईट न्यूजफ्लेयर वेबसाईटवर अधिकृत व्हिडिओ मिळाला. त्यानुसार, बंगळुरूमधील विनायक हॉस्पिटलमधील डॉ. सुनीता यांचा 26 नोव्हेंबर 2017 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. रुग्णांच्या नोंदवहीत लिहित असताना त्या खाली कोसळल्यावर त्यांना लगेच आसीयूमध्ये नेण्यात आले. त्यांना मधुमेहाचा त्रास होता आणि त्यादिवशी त्यांच्या साखरेची पातळी जास्त वाढली होती.

मूळ व्हिडिओ – न्यूजफ्लेयर

या घटनेची खात्री करण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने बंगळुरूच्या विनायक हॉस्पिटलशी संपर्क साधला. हॉस्पिटल प्रशासनातर्फे सांगण्यात आले की, हा व्हिडिओ सुमारे पाच-सहा वर्षांपूर्वीचा आहे. यात दिसणाऱ्या महिला डॉक्टरचे नाव सुनीता होते. अनेक वर्षांपासून हा व्हिडिओ व्हायरल होत असून, तो मुंबईचा नाही तर बंगळुरूचा आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, बंगळुरूमधील विनायक हॉस्पिटलमधील डॉक्टरच्या मृत्युचा व्हिडिओ मुंबईच्या नावाने व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावलेल्या डॉक्टरचा व्हिडिओ मुंबईचा नाही; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Partly False