अब्दुल सत्तार यांचा ‘अर्वाच्य शिवीगाळ’ करतानाचा 5 वर्षे जुना व्हिडियो व्हायरल; वाचा सत्य

Missing Context राजकीय

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार एका जणाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असतानाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये सत्तार कथितरीत्या एका व्यक्तीला धमकावत असताना हनुमानाबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरत असल्याचे ऐकू येते. सध्या सुरू असलेल्या ‘अझान विरुद्ध हनुमान चालिसा’ वादाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडिओ ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत शिवसेना मंत्री अबुदल सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ 2017 मधील आहे. त्यावेळी सत्तार काँग्रेसपक्षातर्फे आमदार होते. तसेच, सध्या सुरू असलेल्या अझान विरुद्ध हनुमान चालिसा वादादरम्यानचा हा व्हिडिओ नाही.

काय आहे दावा?

सुमारे तीस सेंकदाच्या या क्लिपमध्ये एक व्यक्ती शिवीगाळ करत आक्षेपार्ह भाषेत धमकावत आहे. नितेश राणे यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटले की, “शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार प्रभू हनुमानाबद्दल अर्वाच्य शिवीगाळ करताना…उद्धव ठाकरे स्वतःला मर्द म्हणता ना…मग या सत्तारला तरुंगात डांबून दाखवा!”

(सूचना – आक्षेपार्ह भाषेचा वापर)

फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर करून म्हटले कॅप्शन दिली जात आहे की, शिवसेनेचा हा मंत्री अब्दुल सत्तार हिंदू देवतांच्या नावाने शिव्या देतोय आणि हिंदुत्वाचे ज्ञान पाजळणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर शांत बसतात.

(सूचना – आक्षेपार्ह भाषेचा वापर)

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे शोधले. सदरील व्हिडिओ अब्दुल सत्तार यांचाच असून त्यांनी 2017 साली एका शेतकऱ्याला शिवीगाळ केली होती. 

लोकसत्ता’च्या 14 जून 2017 रोजीच्या वृत्तानुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्तार शेख सत्तार नावाच्या शेतकऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जमिनीच्या अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली होती. सत्तार यांच्याविरोधात धमकावणे आणि मारहाण करण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शेतजमिनीवरून अब्दुल सत्तार आणि मुख्तार सत्तार यांच्यात वाद होता. अब्दुल सत्तार आणि मुख्तार सत्तार यांच्या शेतजमिनी आजुबाजूला आहेत. मात्र, अब्दुल सत्तार आपली जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा मुख्तार यांनी आरोप केला होता.

एबीपी माझा वाहिनीशी बोलताना सत्तार यांनी सांगितले होते की, मुख्तार सत्तार ज्या जमिनीवर दावा करत होते ती जमीन सखाराम कल्याणकर यांची आहे. त्यांच्यात वाद सुरू झाल्यावर सत्तार पोलिसांना बोलवून या भांडणात पडले. 

“कल्याणकर यांना मारहाण सुरु झाली होती. मी मध्ये पडलो नसतो तर त्यांचा जीव गेला असता. त्यांच्या सोबत वाद घातला असल्यामुळे मी शिव्या देऊन त्यांना हुसकावून लावलं. जमीन बळकवण्याचा माझ्यावर जो आरोप करण्यात आला आहे. तो निराधार आहे,” असे ते म्हणाले होते.

सत्तारांविरोधात संतापाची लाट

सत्तार यांनी हनुमानाचा उल्लेख करत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांच्यावर तीव्र टीका करण्यात आली होती. हिंदू जागरण मंचच्या वतीने सिल्लोड तहसील कार्यालयासमोर अब्दुल सत्तार यांच्या पुतळयाला जोडे मारून आणि पुतळा जाळून निदर्शने व आंदोलन करण्यात आले होते. तसेच, अब्दुल सत्तार यांना 12 तासाच्या आत अटक केली नाही तर सिल्लोड शहरात शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करून तीव्र निदर्शन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. याचबरोबर 17 जून 2017 रोजी सिल्लोड बंदचीसुद्धा हाक देण्यात आली होती.

सत्तार तेव्हा काँग्रेस आमदार

2017 साली अर्वाच्य शिवीगाळ केली तेव्हा अब्दुल सत्तार काँग्रेसपक्षातर्फे सिल्लोडचे आमदार होते. 2014 साली ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडूण आले होते. 2017 साली राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजप-शिवसेना युतीचे सरकार होते. 

30 जुलै 2018 रोजी सत्तार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाविरोधात काम केल्याच्या कारणावरून काँग्रेसतर्फे सत्तार यांना पक्षातून काढून टाकले होते. 

2019 विधानसभेच्या आधी सत्तार यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करण्याचा कयास लावला जात होता. परंतु, स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर त्यांनी ही अराजकीय भेट असल्याचे स्पष्ट केले होते.

अखेर 2 सप्टेंबर 2019 रोजी सत्तार यांनी मातोश्री येथे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकीटावर निवडूण आल्यानंतर ते सध्या मंत्रीमंडळात महसूल राज्यमंत्री पदावर आहेत.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, अब्दुल सत्तार यांनी अर्वाच्य शिवीगाळ करण्याचा व्हायरल व्हिडिओ पाच वर्षांपूर्वीचा आहे. जुना व्हिडिओ सध्या तापलेल्या राजकीय वातावरणात पुन्हा शेअर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर या व्हिडिओचा सविस्तर संदर्भ समजून घेणे गरजेचे आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:अब्दुल सत्तार यांचा ‘अर्वाच्य शिवीगाळ’ करतानाचा व्हिडियो व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Missing Context


Leave a Reply