ऑस्ट्रेलियाची जर्सी घालून ‘भारत माता की जय’ म्हणणारा व्यक्तीच्या व्हिडिओचे सत्य काय?

Missing Context आंतरराष्ट्रीय

यूएईमध्ये नुकतेच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकामध्ये भारतीय संघ पहिल्या फेरीतूनच बाद झाला. त्यानंतर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचे आवाहन संपुष्टात आणले. या सामन्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप पसरला. यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमची जर्सी घातलेली एक व्यक्ती स्टेडियममध्ये भारत माता की जय, वंदे मातरम अशी घोषणाबाजी करताना दिसतो.

हा व्हिडिओ शेअर करून कोणी दावा करत आहे की, हा ऑस्ट्रेलियन टीमचा खेळाडू आहे तर कोणी म्हणत आहे की, पाकिस्तानला हरविल्यानंतर ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी भारताला समर्थन देत असा जल्लोष केला.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे दावे निराधार आणि चुकीचे आढळले. हा व्हिडिओ जुना असून, त्याचा नुकतेच झालेल्या ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सामन्याशी काही संबंध नाही. 

काय आहे दावा?

व्हायरल व्हिडिओसोबत कॅप्शन दिली की, “याला म्हणतात खुन्नस पाकिस्तान हरल्यानंतर आनंद झालेला ऑस्ट्रेलिया.” ही पोस्ट 56 हजार पेक्षा जास्त लोकांनी लाईक केली असून तिला 2700 पेक्षा जास्त शेअर्स आहेत.

मूळ व्हिडिओ

काय आहे सत्य?

व्हिडिओतील व्यक्तीने जी जर्सी घातली आहे ती ऑस्ट्रेलियाने त्या दिवशीच्या मॅचमध्ये घातली नव्हती. विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाची मूळ जर्सी आणि या व्यक्तीच्या अंगातील जर्सी वेगवेगळी आहे. 

तसेच, व्हिडिओमध्ये World Cricket Fans अशा लोगो आहे. हे लक्षात घेऊन कीवर्ड्सद्वारे सर्च केले. त्यातून कळाले की, हा व्हिडिओ गेल्या अनेक महिन्यांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. 

World Cricket Fans नावाच्या युट्यूब चॅनेल आणि ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ जानेवारी 2021 मध्ये अपलोड करण्यात आल्याचे आढळले. सोबत म्हटले की, ही व्यक्ती ऑस्ट्रेलियन क्रिकेट फॅन आहे. 

व्हिडिओसोबतच्या माहितीमध्ये म्हटले आहे की, गाबा मैदानावर पाऊस सुरू असताना या ऑस्ट्रेलियन फॅनने भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान झालेल्या चौथ्या टेस्ट मॅचदरम्यान 18 जानेवारी रोजी हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला होता. भारताने या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला तीन विकेट राखून हरविले होते.

World Cricket Fans ही जगभरातील क्रिकेट फॅन्सचे व्हिडिओ शेअर करत असते. 

याहू स्पोर्ट्सवरील बातमीनुसार, ऑस्ट्रेलिया टीमची जर्सी घातलेल्या या क्रिकेट फॅनने मैदानावर भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या होत्या. 

World Cricket Fans ने हा व्हिडिओ ट्वीट करताना याचे श्रेय डॉ. आशुतोष मिश्रा नामक युजरला दिले आहे. ट्विटर बायोनुसार, डॉ. मिश्रा हे ऑस्ट्रेलियातील इन्स्टिट्यूट फॉर ऑस्ट्रेलिया इंडया एंगेजमेंट संस्थेचे सीईओ आहेत.

18 जानेवारी 2021 रोजी त्यांनी ट्विट करून माहिती दिली होती की, ‘भारत माता की जय’ म्हणणाऱ्या या ऑस्ट्रेलियन फॅनचा व्हिडिओ त्यांनी गाबा स्टेडियमममध्ये काढला होता. ते म्हणाले होते की, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी असल्यामुळे हा व्हिडिओ चित्रित करण्याची भाग्य मला लाभले.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, हा व्हिडिओ टी-20 विश्वचषकादरम्यानचा नाही. दहा महिन्यांपूर्वीचा हा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे.

Avatar

Title:ऑस्ट्रेलियाची जर्सी घालून ‘भारत माता की जय’ म्हणणारा व्यक्तीच्या व्हिडिओचे सत्य काय?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


Leave a Reply