FAKE NEWS: इंग्लंडला ‘इस्लामिक राष्ट्र’ घोषित करण्याच्या मागणीसाठी प्रदर्शन करण्यात आले का?

False सामाजिक

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, इंग्लंडला ‘इस्लामिक राष्ट्र’ घोषित करा या मागणीसाठी मुस्लिम समुदायाने लंडनमध्ये प्रदर्शन केले. सोबत प्रदर्शनाचा व्हिडिओदेखील शेअर केले जात आहेत. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. यामध्ये इस्लामिक राष्ट्र घोषित करा अशी मागणी करण्यात आली नव्हती.

काय आहे दावा?

व्हायरल व्हिडिओमध्ये रस्त्यावर हजारो लोक जमल्याचे दिसते. स्टेजवरून एक व्यक्ती भाषणदेखील करीत आहे. 

या व्हिडिओसोबत युजरने कॅप्शन शेअर केली की, “इंग्लंडमधील मुस्लिम समाजाने इंग्लंड हा इस्लामिक राष्ट्र घोषित करा अशी मागणी केली आहे. इंग्लंडमधील मूळ रहिवाशी आधी झोपले होते आता लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढल्याने ही मागणी झालेली आहे. अशी वेळ भारतावर येऊ नये आता तरी जागे व्हा तुम्ही तर झोपू नका.”

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या व्हिडिओचे बारकाईने निरीक्षण केले. यामध्ये “The Prophet is Dearer To Us Than Our Parents” असा एक बोर्ड आहे. शिवाय भाषणामध्ये स्टेजवरील व्यक्ती म्हणतो की, “इंग्लंडच्या संसदेसमोर आम्ही आज शांततापूर्ण जमलो आहोत. या देशाचे नागिरक असण्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही राज्यकर्त्यांना विनंती करून इच्छितो की, मोहम्मद पैगंबर यांचा अपमान न होऊ देणे आमचा अधिकार आहे.” यामध्ये कुठेही इस्लामिक राष्ट्र घोषित करा, अशी मागणी केलेली नाही. 

विविध कीवर्ड सर्च केल्यावर आम्हाला 2012 साली अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ आढळला. ‘तकबीर टीव्ही’ नामक युट्युब चॅनेलवर या प्रदर्शनचा लाईव्ह चित्रित केलेला व्हिडिओ आढळला.

यावरून कळाले की, 2012 साली एका चित्रपटात इस्लाम धर्म आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची खिल्ली उडविल्याबद्दल आक्षेप घेत जगभरात मुस्लिम समुदायाने विरोध प्रदर्शने केली होती. 

त्याचाच भागा म्हणून सप्टेबंर 2012 मध्ये इंग्लंडच्या संसदेसमोर विविध इस्लामिक संस्थांनी एकत्र येत रॅली काढली होती. यावेळी स्टेजवरून विविध मान्यवरांनी भाषणे करून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. संपूर्ण व्हिडिओ येथे पाहा.

या व्हिडिओतील स्टेज आणि व्हायरल व्हिडिओतील स्टेज यांची तुलना केल्यावर लगेच कळते की, व्हायरल व्हिडिओ येथूनच घेतलेला आहे. 

काय होते नेमके प्रकरण?

Innocence of Muslims नामक एका चित्रपटावरून प्रचंड वाद उफाळला होता. या चित्रपटात मोहम्मद पैगंबर यांचे चरित्र आक्षेपार्हरीत्या दाखविल्याने मुस्लिम समुदायाने या चित्रपटाचा विरोध केला होता. सुडानमध्ये तर अमेरिकेच्या दुतावासासमोर प्रदर्शन हिंसक झाले आणि सात लोकांचा बळी गेला. इंग्लंडमध्येदेखील अशी प्रदर्शने झाली होती. तेथील अमेरिकन दुतावास आणि गुगलच्या मुख्यालयासमोरदेखील जमावाने घोषणाबाजी केली होती. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, सुमारे नऊ वर्षे जुना व्हिडिओ सांप्रदायिक दाव्यासह शेअर केला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मुस्लिमांतर्फे इंग्लंडला इस्लामिक राष्ट्र घोषित करण्याची मागणी करण्यात आली नव्हती. मोहम्मद पैगंबराची बदनामी करणाऱ्या चित्रपटाचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीचा हा व्हिडिओ आहे.

Avatar

Title:इंग्लंडला ‘इस्लामिक राष्ट्र’ घोषित करण्याच्या मागणीसाठी प्रदर्शन करण्यात आले का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False