पाकिस्तानातील व्हिडिओ मुंबईत त्रिपुरा हिंसाचाराविरोधातील आंदोलनाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False राजकीय

त्रिपुरातून सांप्रदायिक हिंसाचाऱ्याच्या बातम्या येत असताना देशभरात याविषयी प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर एका जमावाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, त्रिपुरातील हिंसाचाराविरोधात मुंबईत काढलेल्या प्रदर्शनाचा हा व्हिडिओ आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की हा व्हिडिओ पाकिस्तानातील एका धार्मिक नेत्याच्या शोकसभेचा आहे. 

काय आहे दावा?

व्हायरल व्हिडिओमध्ये प्रचंड संख्येने लोक रेल्वेपुलाखाली जमलेले दिसतात. सोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “त्रिपुरामध्ये होत असलेल्या अत्याचाराविरोधात मुंबईत लाखो लोक रस्त्यावर उतरले.”

फेसुबक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा व्हिडिओ खरंच मुंबईतील आहे का हे तपासले. निरीक्षणांती समजले की, व्हिडिओत दिसणारी मेट्रो रेल्वे पाकिस्तानातील ऑरेंज मेट्रो लाईन आहे. लाहोरमध्ये 2015 साली ही मेट्रो सुरू झाली होती.

यावरून शोध घेतल्यावर पाकिस्तानच्या लाहोर शहरातील मेट्रो आणि या पुलाचे अनेक फोटो मिळाले. त्यांची व्हायरल होत असलेलया व्हिडिओतील पुलाशी आणि रेल्वेशी तुलना केली. 

यानंतर व्हिडिओतील की-फ्रेम्सला रिव्हर्स इमेज सर्च केले. त्याद्वारे युट्यूबवर 4 जानेवारी 2021 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ सापडला. हा तोच व्हिडिओ आहे जो व्हायरल होत आहे. 

व्हिडिओचे शीर्षक आहे – “Allama Khadim Hussain Rizvi Chehlum I TLP Chehlum 2021.” Chehlum म्हणजे इस्लाम धर्मामध्ये व्यक्तीच्या मृत्यू पश्चात 40 दिवसानंतर केली जाणारी शोकसभा. याचाच अर्थ की, हे लोक हुसैन रिझवी यांच्या शोकसभेसाठी जमले होते.

हुसैन रिझवी कोण होते?

रिझवी हे पाकिस्तानातील एक धर्मगुरू आणि तेहरीक-ए-लबैक पाकिस्तान (टीएलपी) नामक पार्टीचे प्रमुख होते. 19 नोव्हेंबर 2020 रोजी त्यांचे वयाच्या 54व्या वर्षी निधन झाले होते. त्यानंतर चाळीस दिवसांनंतर म्हणजे 3 जानेवारी 2021 रोजी त्यांची धार्मिक प्रथेनुसार लाहोर शहरातील रहमत लिल अलामीन मशीदीमध्ये त्यांची शोकसभा आयोजित करण्यात आली होती.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबईतील नसून, तो पाकिस्तानातील लाहोर शहरातील आहे. त्यामुळे त्रिपुरातील हिंसाराविरोधात मुंबईत काढलेल्या प्रदशर्नाचा हा व्हिडिओ आहे, हा दावा असत्य सिद्ध होते.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:पाकिस्तानातील व्हिडिओ मुंबईत त्रिपुरा हिंसाचाराविरोधातील आंदोलनाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False