
दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, भारतीय लष्कराने बांग्लादेशमध्ये इसिसच्या कैदेतून 38 हिंदू मुलींना सोडविले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचा नाही. हा व्हिडिओ सीरियातील आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये साखळीने बांधलेल्या दोन लहान मुलींची सैनिकांकडून सुटका केली जात आहे. कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे की, “भारतीय सैन्याने आय एस आय एसच्या अड्डयावर छापे मारून बांगलादेशच्या बॉर्डरवरून 38 हिंदू मुलींना सोडवण्यात यश आले.” (कॅप्शन जशास तशी)
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
भारतीय लष्कराने अतिरेक्यांच्या कॅम्पमधून 38 मुलींची सुटका केल्याची बातमी नक्कीच चर्चेत आली असती. परंतु, अशी कोणतीही बातमी आढळली नाही.
व्हिडिओमध्ये “YPJ Mavenda Ragihandine” असा लोगो आहे. या संबंधित कीव्हर्ड सर्च केल्यावर काळाले की, YPJ ही इसिसविरोधात लढणारी महिलांची लष्करी संघटना आहे. सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सची ती भाग आहे.
सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसने 6 सप्टेंबर 2022 रोजी त्यांच्या युट्युब चॅनलवर मुलींच्या सुटकेचा हा व्हिडिओ अपलोड केला होता.
इसिसने अल-होल कॅम्पमध्ये डांबून ठेवलेल्या चार येझदी मुलींची YPJ ने सुटका केल्याचे सोबतच्या माहितीमध्ये म्हटले आहे.
5 सप्टेंबर 2022 रोजी ही मोहीम पार पडली होती. YPJ महिला संरक्षण युनिटने केलेल्या कारवाईक चार महिलांना मुक्त करण्यात आले होते. इसिसने या मुलींना साखळीने बांधून ठेवले होते. तसेच, त्यांच्या अतोनात अत्याचार करण्यात आले होते.

YPJ महिला संरक्षण युनिटच्या कमांडर दिलबिरीन कोबाने यांनी ट्विट द्वारे माहिती दिली की, “डंबून ठेवलेल्या चार महिलांना आम्ही वाचविले. लहान वयातच या मुलींचे लग्न लावून देण्यात आले होते. त्यांच्यावर मानसिक छळ व अत्याचार करण्यात आला आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांना मानसिक उपचारांची गरज असून त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात आले आहे.”
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ भारतीय लष्कराचा नाही. गेल्या वर्षी सीरियाच्या महिला संरक्षण युनिटने इसिसच्या ताब्यातून चार मुलींची सुटका केली होती. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:इसिसच्या कैदेतून मुलींना सोडविण्याचा सीरियामधील व्हिडिओ भारतीय लष्कराच्या नावाने व्हायरल
Written By: Sagar RawateResult: False
