नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत का? वाचा सत्य

False राजकीय | Political

सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात येत आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. स्वतंत्र भारताच्या 75 वर्षांमध्ये प्रथमच असा बहुमान भारतीय पंतप्रधानांना मिळाल्याचे मेसेजमध्ये म्हटलेले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा असत्य आहे. 

काय आहे मेसेज?

व्हायरल मेसेजमध्ये लिहिलेले आहे की, “जगातील सर्वात ताकतवर नेते म्हणून ओळख असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी अखेर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदावर विराजमान. 75 वर्षांत भारताकडे प्रथमच अध्यक्षपद.”

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुक 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम इंटरनेटवर या माहितीचा शोध घेतला. नरेंद्र मोदी यांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड होणे मोठी बातमी आहे. परंतु, कोणत्याही न्यूज मीडियाने याविषयी बातमी दिलेली नाही. त्यामुळे या दाव्याच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित होते. 

अधिक सर्च केल्यावर कळाले की, गेल्यावर्षी नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या समुद्री सुरक्षेविषयीच्या बैठकीचे अध्यक्षपद भुषवले होते. 

भारताकडे गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद होते. 

UNSC च्या वेबसाईटनुसार, प्रत्येक सदस्य देशाला एका महिन्याकरिता सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळतो. त्या त्या देशाच्या नावाच्या आद्याक्षरक्रमानुसार अध्यक्षपद दिले जाते. या वर्षी डिसेंबर महिन्यात भारताकडे पुन्हा अध्यक्षपद येणार आहे.

थोडक्यात काय तर नरेंद्र मोदी सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष नव्हते. ते केवळ एका बैठकीचे अध्यक्ष होते. 

भारताला हा बहुमान प्रथमच मिळाले का?

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे एकुण 15 सदस्य देश आहेत. त्यात अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि चीन हे पाच स्थायी सदस्य आहेत, तर भारतासह इतर 10 देश अस्थायी सदस्य आहेत. 

भारत 1950 साली सुरक्षा परिषदेचा सदस्य झाला होता. त्यामुळे असा बहुमान प्रथमच भारताला मिळाला असे म्हणनेदेखील चुकीचे आहे.  31 डिसेंबर 2022 रोजी भारताचे सदस्यत्व संपुष्टात येईल.

मूळ वेबसाईट – UNSC

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष झालेले नाहीत. ही फेक न्यूज आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False