कोरोनाच्या नावाखाली किडनी तस्करी केली जात आहे का? वाचा त्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य

Coronavirus False

Sudha Hospital

कोरोनाच्या नावाखाली दवाखान्यांमध्ये अवयव चोरीचा गोरखधंदा सुरू असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्याला पुरावा म्हणून मृत रुग्णाचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी किडनी काढल्याचे आरोप करतानाचा एक व्हिडिओ सध्या फिरत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडिओ जुना आणि त्याद्वारे केला जाणारा आरोप खोटा असल्याचे समोर आले.

काय आहे व्हिडिओमध्ये?

सुमारे तीन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मृत रुग्णाचे नातेवाईक डॉक्टर आणि हॉस्पिटल प्रशासनावर किडनी काढून घेतल्याचा आरोप करीत शिवीगाळ करताना दिसतात. रुग्णाच्या पोटावरील पट्टीकडे निर्देश करीत ती कशामुळे बांधली हे दाखवण्याची मागणी करतात. तसेच हॉस्पिटलमधील गोरखधंदा मीडियामध्ये दाखवणार असेदेखील व्हिडिओ चित्रित करणारा व्यक्ती म्हणतो.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, कोरोनाच्या नावावर तुमच्या घरातल्यांना मारुन त्यांचे अवयव काढले जात आहेत. आणी तुम्ही करत बसा जनता करफ्यु. समजुन जावा रे कोरोना इतका खतरनाक नाही. हे एक षडयंत्र आहे.”

मूळ व्हिडिओ येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह

पोस्टमध्ये हा व्हिडिओ कुठला आहे, तो कधीचा आहे याबाबत काहीच माहिती दिलेली नाही. ते आधी शोधून काढू.

व्हिडिओचे बारकाईने निरीक्षण केले असता लक्षात येते की, कोणीही मास्क घातलेले नाही. एका ठिकाणी मृत रुग्णाचा नातेवाईक ‘सुधा हॉस्पिटल’ असे नाव उच्चारतो. तसेच ही व्हिडिओमध्ये ऐकू येणारी भाषेमध्ये राजस्थानकडील लहेजा आहे.

हा धागा पकडून की-वर्ड्सच्या माध्यामातून शोध घेतला. तेव्हा युट्यूबवर 6 नोव्हेंबर 2018 रोजी अपलोड करण्यात आलेला सेम व्हिडिओ मिळाला. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचे हे अधिक लांबीचे व्हर्जन आहे. व्हिडिओचे शीर्षक “कोटा के सुधा हॉस्पिटल पर मृतक की किडनी निकालने का गंभीर आरोप लगाया मृतक के परिजनों ने” असे आहे.

यावरून स्पष्ट होते की, या दोन वर्षे जुन्या व्हिडिओचा सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटाशी काही संबंध नाही. मग या व्हिडिओविषयी अधिक माहिती घेतली. 

‘पत्रिका’ वृत्तपत्राच्या 4 नोव्हेंबर 2018 रोजीच्या बातमीनुसार, कोटा येथील सुधा हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली होती. हॉस्पिटलचे बिल न भरण्यासाठी मृताच्या रुग्णांनी असा धिंगाणा घालत किडनी चोरीचा आरोप लावला होता. परंतु, पोस्ट मॉर्टम केल्यानंतर रुग्णाच्या शरीरातच किडनी असल्याचे स्पष्ट झाले होते.

इंडिया टीव्हीनेदेखील यासंबंधी बातमी प्रकाशित केली होती. यामध्ये संबंधित डॉक्टरचे म्हणने दिलेले आहे.

सुधा हॉस्पिटलतर्फे 4 नोव्हेंबर 2018 रोजी या घटनेसंदर्भात खुलासा करण्यात आला होता. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी व्हिडिओ संदेश जारी करीत म्हटले की, सदरील रुग्ण गंभीर अवस्थेत दवाखान्यात भरती झाला होता. ऑपरेशन केल्यावर उपचारा प्रतिसाद न दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. परंतु, रुग्णाच्या नातेवाईकांनी सुधा हॉस्पिटलला बदनाम करण्यासाठी किडनी चोरीचा आरोप करीत व्हिडिओ तयार केला व तो सोशल मीडियावर पसरविला. पोस्ट मॉर्टम करून आम्ही हे सिद्ध केले की, किडनी काढण्यात आली नव्हती.

अर्काइव्ह

फॅक्ट क्रेसेंडोने मग थेट सुधा हॉस्पिटलमधील डॉक्टर सुधा अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला. सोशल मीडियावरील दाव्यांचे खंडन करीत त्यांनी सांगितले की, “सदरील व्हिडिओला कोरोनाशी जोडून चुकीचा आरोप केला जात असून, याविरोधात आम्ही पोलिसांकडे तक्रार केलेली आहे.” डॉ. सुधा यांनी फॅक्ट क्रेसेंडोला तक्रारीची प्रतसुद्धा पाठवली.

व्हिडिओतील घटनेबद्दल सविस्तर बोलताना त्यांनी सांगितले की, सदरील रुग्णावर क्रॅनियोटॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ज्यामध्ये त्याच्या डोक्यातील एक हाड पोटातील आवरणात ठेवण्यात आले होते. रुग्ण दवाखान्यात आला तेव्हाच फार गंभीर अवस्थेत होता. त्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी पोटावरील जखम दाखवत किडनी चोरीचा आरोप करीत धिंगाणा घातला. यानंतर आम्ही पोस्ट मॉर्टम करून दाखवले की, किडनी रुग्णाच्या शरीरातच आहे. त्यामुळे किडनी चोरीचा आरोप पूर्णतः खोटा सिद्ध झाला. दोन वर्षांनंतर आता हा व्हिडिओ पुन्हा कोरोनाच्या नावाने पसरत आहे. अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये.”

फॅक्ट क्रेसेंडोने त्यांच्याकडे पोस्ट मॉर्टम रिपोर्ट मागितला असता त्यांनी तो पाठविला. अहवालाचे पहिले पान तुम्ही खाली पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असेलेला व्हिडिओ 2018 सालचा आहे. त्याचा कोरोनाशी काही संबंध नाही. तसेच व्हिडिओतील किडनी चोरीचा आरोप खोटा सिद्ध झालेला आहे. त्यामुळे या व्हिडिओद्वारे केले जाणारे दावे असत्य ठरतात.

Avatar

Title:कोरोनाच्या नावाखाली किडनी तस्करी केली जात आहे का? वाचा त्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False