उबर-ओलाला पर्याय म्हणून टाटा ग्रुपने Cab-E टॅक्सी सेवा सुरू केल्याची अफवा व्हायरल

Economy False

उबर आणि ओला यांसारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी टाटा ग्रुपतर्फे ‘कॅब-ई’ (Cab-E) नावाची नवी ऑनलाईन टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली, असा सोशल मीडियावर दावा केला जात आहे. सध्या मुंबई आणि पुण्यात उपलब्ध या सेवेला टाटा ग्रुपच्या नावाने साथ देण्याचे भावनिक आवाहन करण्यात येत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे समोर आले.

काय आहे दावा?

एका अ‍ॅपची लिंक देऊन पोस्टमध्ये म्हटले की, “टाटा ग्रुपतर्फे कॅब-ई लाँच झाली असून खालील लिंकने APP डाउनलोड करा. परदेशी ओला आणि उबर यांना पर्याय आला. आपण सगळ्यांनीच टाटा ग्रुपला त्यांचं या देशासाठी असलेलं योगदान लक्षात घेता प्रथम प्राधान्य टाटांना द्यायला हवे. सुरुवातीला कदाचित सर्व्हिस मध्ये त्रास होईल पण सपोर्ट करा, निश्चितच टाटा संपूर्ण देशभर पसरेल. आपल्या देशाच्या या भक्ताला आपणच हात द्यायला हवा, नाही का ? आत्ता तरी मुंबई पुणे इथेच कार्यरत होणार आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम टाटा ग्रुपतर्फे कॅब-ई नावाने काही सेवा सुरू करण्यात आली का याचा शोध घेतला असता एकही बातमी आढळली नाही.

त्यानंतर पोस्टमध्ये दिलेली लिंक ओपन केली. ती कॅब-ई नावाच्या एका ऑनलाईन टॅक्सी अ‍ॅपची लिंक आहे. तेथे उपलब्ध माहितीनुसार, CAB-EEZ INFRA TECH PVT. LTD नावाच्या कंपनीचे हे अ‍ॅप आहे. येथे टाटा ग्रुपचे नाव अथवा कोणतेही माहिती नाही.

मूळ वेबसाईट येथे पाहा – प्ले स्टोर 

हा धागा पकडून मग कॅब-ई अ‍ॅपच्या कंपनीची अधिकृत वेबसाईट तपासली. त्यातून कळाले की, कुलदीप घोष, इंद्रनील चक्रवर्ती आणि नितिन शर्मा यांनी मिळून ही कंपनी स्थापन केली होती. ते या कंपनीचे अनुक्रमे CEO, COO आणि CFO आहेत.

कंपनीच्या वेबसाईटवर पार्टनर कंपन्यांची यादी दिलेली आहे. यामध्ये कोडिएंट, अ‍ॅक्सिस बँक, मॅजेंटा पॉवर आणि युनिव्हर्सल अ‍ॅडव्होकेट्स या कंपन्यांची नावे आहेत.

यामध्ये टाटा ग्रुप अथवा टाटा मोटर्स कंपनीचे नाव नाही.

मूळ वेबसाईट येथे पाहा – CAB-E

फॅक्ट क्रेसेंडोने मग कॅब-ई कंपनीचे सहसंस्थापक इंद्रनील चक्रवर्ती यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सोशल मीडियावरील दावा खोटा असल्याचे सांगितले.

“आमच्या कंपनीबद्दल सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला दावा पूर्णतः चुकीचा आहे. कॅब-ई ही मुंबईस्थित कंपनी असून 2019 मध्ये आम्ही अ‍ॅप लाँच केले होते. आम्ही कुठेही टाटा ग्रुपचा आमच्या कंपनीशी काही संबंध आहे, असे म्हटलेले नाही. याउलट असे दावे व्हायरल होऊ लागल्यानंतर कंपनीच्या फेसबुक अकाउंटद्वारे याविषयी खुलासादेखील केला आहे,” असे चक्रवर्ती म्हणाले.

कॅब-ई कंपनीच्या फेसबुकवरील तो खुलासा आपण काली पाहू शकता.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, कॅब-ई या ऑनलाईन टॅक्सी सेवेचा टाटा ग्रुपशी काही संबंध नाही. ती पूर्णतः वेगळी कंपनी आहे. त्यामुळे टाटा ग्रुपविषयी केला जाणारा दावा खोटा आहे.

Avatar

Title:उबर-ओलाला पर्याय म्हणून टाटा ग्रुपने Cab-E टॅक्सी सेवा सुरू केल्याची अफवा व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False