पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांचे आंदोलन म्हणून बांग्लादेशातील जुना व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य

False सामाजिक

हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर शेयर केला जात आहे. हा व्हिडियो पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरातील सांगून सामाजिक सौहार्द भंग करण्याचा खोडसाळ प्रयत्न केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या अनेक वाचकांनी हा व्हिडियो नेमका कुठला आहे याची विचारणा केली. त्यानुसार पडताळणी केली असता, हा व्हिडियो 2017 साली बांग्लादेशातील ढाका शहरातील मोर्चाचा असल्याचे समोर आले.

काय आहे दावा?

सुमारे दोन मिनिटांच्या व्हिडियोमध्ये हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावरून घोषणाबाजी करीत हातात फलक घेऊन मोर्चा काढताना दिसतात. सोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, हे दृश्य काही काश्मीर किंवा केरळमधील नाहीत. ही ममता बॅनर्जींच्या पश्मिच बंगालमधील कोलकाता शहरातील घटना आहे.

या व्हिडियोवरून सांप्रदायिक टीका केली जात आहे. त्यामुळे हा व्हिडियो नेमका कुठला आहे हे जाणून घेणे आवश्यक ठरते.

मूळ पोस्ट येते पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम कोलकाता शहरात अशी काही घटना घडली का याचा शोध घेतला. तेव्हा कोलकाता पोलिसांचे एक ट्विट आढळले. त्यात त्यांनी सदरील व्हायरल व्हिडियो कोलकाता शहरातील नसल्याचे सांगितले. “बांग्लादेशातील मोर्चाचा व्हिडियो कोलकात्याचा म्हणून पसरविला जात आहे. फेक न्यूज पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे पोलिसांनी स्पष्ट केले.

अर्काइव्ह

हा धागा पकडून मग पुढे शोध घेतला. तेव्हा युट्यूबवर 2017 साली अपलोड करण्यात आलेला एक व्हिडियो सापडला. तो तुम्ही खाली पाहू शकता. व्हिडियोच्या शीर्षकात म्हटले की, बांग्लादेशातील म्यानमार दूतावासाला वेढा. हा तोच व्हिडियो आहे जो सध्या व्हायरल होत आहे. यात स्पष्टपणे लोकांच्या घोषणा ऐकू येतात, त्यांच्या हातातील फलक दिसून येतात.

व्हिडियोचे नीट निरीक्षण केले असता दिसते की, पोलिसांचा गणवेश कोलकाता पोलिसांचा नाही. तो बांग्लादेशातील पोलिसांचा आहे. तसेच आंदोलकांच्या हातातील फलकावरून स्पष्ट होते की, म्यानमानरमध्ये रोहिंग्या मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात हे आंदोलन करण्यात आले होते. माध्यमांतील बातम्यांनुसार, 13 सप्टेंबर 2017 रोजी ढाका शहरातील म्यानमार दूतावासासमोर मोठे जनआंदोलन करण्यात आले होते. इस्लामी आंदोलन बांग्लादेश नावाच्या राजकीय पक्षाने यासाठी आवाहन केले होते. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, बांग्लादेशात 2017 साली झालेल्या एका आंदोलनाचा व्हिडियो कोलकाता शहरातील म्हणून शेयर केला जात आहे. सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने ही फेक न्यूज पसरविली जात आहे. वाचकांनी यावर विश्वास ठेवू नये.

Avatar

Title:पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांचे आंदोलन म्हणून बांग्लादेशातील जुना व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False