
बहुचर्चित कसबापेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रसाने यांचा पराभव केला. यासह गेल्या 28 वर्षांपासून बालेकिल्ला असलेली ही जागा भाजपला गमवावी लागली.
प्रतिष्ठेची बनलेल्या या पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपमधील अंतर्गत वाद समोर येत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने एक वादग्रस्त पोस्ट व्हायरल होऊ लागली. या पोस्टमध्ये गडकरी यांनी कथितरीत्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत एकनाथ शिंदेंसोबत केलेल्या युतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, नितीन गडकरी यांच्या नावाने फेक पोस्ट व्हायरल होत आहे. गडकरी यांनी असे विधान केलेले नाही.
काय आहे दावा?
व्हायरल पोस्टमध्ये नितीन गडकरी यांच्या फोटो व नावासह विधान केलेले आहे की, “पुणे जिल्ह्यातील कसबामध्ये झालेली निवडणूक ही भाजपसाठी आत्मचिंतन करण्याची वेळ. खरंच देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना बरोबर घेऊन चुक तर नाही केली ना? जनता कोणासोबत ही झालेला विश्वासघात खपवून घेत नाही.”

मूळ पोस्ट – फेसबुक । फेसबुक । इन्स्टाग्राम
तथ्य पडताळणी
नितीन गडकरी यांनी असे विधान केले असते तर याची नक्कीच मोठी बातमी झाली असती. परंतु, कोणत्याही दैनिक व वृत्तवाहिने यासंदर्भात बातमी केल्याचे आढळले नाही.
तसेच गडकरी यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरसुद्धा अशा प्रकारचे वक्तव्य उपलब्ध नाही.
याउलट आम्हाला ‘लोकमत’ एक बातमी आढळली ज्यानुसार गडकरी यांनी त्यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या बनावट पोस्टविरोधात पोलिसांत तक्रार केली.
सोशल माध्यमांवर गडकरींच्या नावाखाली व्हॉट्सअपवर दिशाभूल करणारी वक्तव्ये फॉरवर्ड केली जात आहेत. ही बाब गडकरी यांच्या कार्यालयाने गंभीरतेने घेतली असून नागपूर पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे, असे या बातमीत म्हटले आहे.

नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने ट्विटर खात्यावरून याबाबत खुलासा केलेला आहे. 3 मार्च रोजी ट्विट करून माहिती दिली होती की, “पुण्यातील कसबा निवडणूक निकालाबाबात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने व्हॉट्सॲप ग्रूपवर खोटे आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये व्हायरल केली जात आहेत.”
नागपूर पोलिसांकडे याची तक्रार करण्यात आली असून गडकरी यांच्या नावाने अशा प्रकारे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती नागपूर पोलिसांना करण्यात आली आहे.
फॅक्ट क्रेसेंडोने गडकरी यांच्या नागपूर कार्यलयाशी संपर्क साधला असता त्यांनीदेखील व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सांगितले. कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालानंतर गडकरी यांच्या नावाने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याविषयीची ती व्हायरल पोस्ट बनावट असून, गडकरी यांनी असे विधान केलेले नसल्याचे कार्यलयाने स्पष्ट केले.
निष्कर्ष
कसबा पेठ पोटनिवडणुकीनंतर गडकरी यांनी भाजप व एकनाथ शिंदे यांच्या युतीवर प्रश्नचिन्ह केलेले नाहीत. त्यांच्या नावाने तथ्यहीन व बनावट विधान व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:कसबापेठ पोटनिवडणुकीतील पराभवानंतर नितीन गडकरींच्या नावावर खोटे विधान व्हायरल; वाच सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
