
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू? शिंदे सरकार जाणार? वाचून आश्चर्य वाटले ना. वाटायलासुद्धा पाहिजे. सोशल मीडियावर अशा वावड्या उठल्या आहेत. टीव्ही-9 मराठी वाहिनीच्या जुन्या बातमीचा व्हिडिओ शेअर करून अफवा पसरविली जात आहे की, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ ‘एप्रिल फूल’निमित्त शेअर केला जात असून ही बातमी 2019 मध्ये लागू झालेल्या राजष्ट्रपती राजवटीची आहे. सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली नाही.
काय आहे दावा ?
या 28 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये बातमी दिलेली आहे की, केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर सादर केलेल्या शिफारसी पत्रावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असून आता महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “आताच्या घडी ची महत्त्वाची बातमी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू. खोके सरकार कोसळले”
मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
कीव्हडर्स सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल होत असलेली बातमी चार वर्षांपूर्वीची आहे.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत युतीचा (भाजप-शिवसेना-आरपीआय) विजय झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष वेगळे झाले. परंतु, दोन्ही पक्षांचे संख्याबळ कमी असल्याने तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तेव्हा महाराष्ट्रातील पक्षांना संख्याबळ सिद्ध करण्यासाठी काही दिवसांची मुदत दिली होती.
परंतु, एकाही पक्षाने पुरेसे संख्याबळ न दाखवल्याने राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद शिफारसी पत्र दिले होते.
टीव्ही-9 मराठीने या बातमीचे लाईव्ह प्रसारण केले होते. खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकतात.
सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची चर्चा का होत आहे ?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाषणादरम्यान म्हणाले की, सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रेसंदर्भात निकाल अजून जाहीर झालेला नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 16 आमदार अपात्र झाले तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल.
खालील व्हिडिओमध्ये आपण पर्ण भाषण पाहू शकता.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली नाही. व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक एप्रिल निमित्त शेअर केला जात असून ही बातमी 2019 मध्ये लागू झालेल्या राजष्ट्रपती राजवटीची आहे. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:APRIL FOOL: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याची अफवा; वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: False
