
राम नवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथे दोन गटांतील भांडणाचे पर्यवसन दगडफेक आणि जाळपोळीत झाले. शहरातील किराडपुरा भागात उफाळलेल्या हिंसाचारात अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले असून 17 वाहनांची जाळपोळ झाली. शहर पोलिसांनी सुमारे 500 जणांवर विविध कलमांन्वये दंगलीचे गुन्हे दाखल केले असून दोषींचे अटकसत्र सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिस काही लोकांना रस्त्यावरून फरफटत ओढून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यासोबत दावा केला जात आहे की, छत्रपती संभाजीनगरमधील दंगेखोरांना पोलिसांनी अशा प्रकारे अटक केले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ हैदराबादमधील असून चुकीच्या माहितीसह तो शेअर केला जात आहे.
काय आहे दावा?
दीड मिनिटांच्या या क्लिपसोबत म्हटले आहे की, “झाड-झुड झोडणे सुरू झाले आहे, आता सर्वांनी तुरुंगाचा लाभ घ्यावा. देवेंद्रजींना हलक्यात घेणाऱ्यांनो अब खैर नहीं ना होगी सूनवाई ना होगी बेल, सीधे होगी जेल.”
मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम तर व्हिडिओमध्ये पोलिसांच्या गाडीचा तेलंगणा राज्यातील नंबरप्लेट आहे. तसेच एके ठिकाणी “Shaffaf” नावाची पाटी दिसते. ही हैदराबादच्या शालीबंदा भागातील मिनरल वॉटर कंपनी आहे.
हे धागे पकडून शोध घेतल्यावर एनडीटीव्ही वाहिनीने 25 ऑगस्ट 2022 रोजी हाच व्हिडिओ ट्विट केल्याचे आढळले. त्यानुसार, गेल्या वर्षी भाजपचे निलंबित वादग्रस्त नेते टी राजा सिंग यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या कथित वादग्रस्त विधानाविरोधात हैदराबादमध्ये जोरदार निदर्शन करण्यात आली होती. तेथली शालीबंदा भागातही मोठी गर्दीसह प्रदर्शन करण्यात आले. यावेळी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला होता.
याविषयी अधिक माहिती घेतल्यावर कळाले की, हैदराबाद पोलिसांनी 24 ऑगस्ट 2022 रोजी हिंसक प्रदर्शन करणाऱ्या मुस्लिम युवकांना त्यांच्या घरात घुसून अटक केली होती. पोलिसांच्या या कडक कारवाईचा व्हिडिओ त्यावेळीसुद्धा बराच गाजला होता.
शालीबंदा भागातील एका सिनेमागृहाजवळ प्रदर्शनकारी जमावाने दगडफेक केली होती. गर्दीला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत अनेका ताब्यात घेतले होते.
अटक करण्यात आलेल्या युवकांच्या कुटुंबांनी पोलिसांवर मुस्कटदाबीचा आरोप लावला होता.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, हैदाराबादमधील जुना व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरच्या नावाने व्हायरल होत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे राम नवमीला झालेल्या हिंसाचाराचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांच्या विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. दंगलप्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:हैदराबादमधील जुना व्हिडिओ संभाजीनगरमध्ये दंगेखोरांच्या अटकेचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
