केरळमधील किनारपट्टीचा व्हिडियो तमिळनाडू येथील रामसेतू म्हणून व्हायरल. पाहा सत्य काय आहे

False सामाजिक

‘रामसेतू’ हा भारतीयांच्या आस्था आणि कुतुहलाचा विषय आहे. तमिळनाडू आणि श्रीलंकेदरम्यान हिंदी महासागरातील या कथित पुलाच्या अस्तित्त्वाविषयी अनेक दावे केले जातात. सोशल मीडियावर तर या रामसेतूवर लोक चालत असल्याचा एक व्हिडियोदेखील शेयर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) हा व्हिडियो पाठवून याची शहानिशा करण्याची विनंती केली.

काय आहे व्हिडियोमध्ये?

सुमारे दोन मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये अनेक लोक समुद्राच्यामध्ये असणाऱ्या वाळूवर चालत असल्याचे दिसते. सोबत लिहिले की, बघा…लोकं रामसेतूवर उभे आहेत. तमिळनाडू येथील धनुषकोडमधील हा व्हिडियो आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

हा व्हिडियो फेसबुकवर मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात येत आहे.

तथ्य पडताळणी

सदरील व्हिडियोमध्ये Abhilash Viswa Photography असे लिहिलेले आहे. गुगलवर याबाबत शोधले असता या नावाचे एक ट्विटर अकाउंट मिळाले. तेथे तपासले असता गेल्या वर्षी 6 ऑक्टोबर 2018 रोजी केलेले एक ट्विट आढळले. यामध्ये सदरील व्हिडियो शेयर केलेला असून सोबत म्हटले की, हा व्हिडियो रामसेतूचा म्हणून तमिळ, कन्नड, तेलुगू आणि इतर अनेक भाषांमध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. परंतु मी सर्वांना सांगू इच्छितो की, हा रामसेतूचा व्हिडियो नाही. हा व्हिडियो मी केरळमध्ये चित्रित केला होता. केरळमध्ये आलेल्या पुरानंतर हेलिकॅमद्वारे हा व्हिडियो शूट केला होता.

अर्काइव्ह

हा व्हिडियो बनवणारे अभिलाष विश्वा हे केरळमधील फोटोग्राफर आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने मग थेट त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी माहिती दिली की, गेल्या वर्षी केरळमध्ये आलेला महापूर ओसरल्यानंतर ऑगस्ट 2018 मध्ये त्यांनी पोन्नानी बीचवर हा व्हिडियो घेतला होता. तेथील एका स्थानिक मंत्र्याने सदरील व्हिडियो रामसेतूचा म्हणून सोशल मीडियावर शेयर केला होता. त्यामुळे सर्वत्र चुकीच्या माहितीसह हा व्हिडियो पसरला. हे लक्षात आल्यावर त्यांनी ट्विटरवर याबाबत स्पष्टीकरण दिले होते. केरळमधील अनेक स्थानिक वृत्तपत्रांनी याबाबत बातमी छापून खरी माहिती लोकांसमोर आणली होती.

याविषयी अधिक माहिती घेतली असता कळाले की, केरळमध्ये महापूरानंतर मल्लापुरम जिल्ह्यातील पोन्नानी बीचवर पुरामुळे समुद्रात वाळूचा मोठ्या प्रमाणात थर साचला. इंग्रजी याला सँडबार किंवा सँडबेड असे म्हणतात. सुमारे अर्धा किलोमीटर लांबीचा हा सँडबार पाहण्यासाठी पोन्नानी बीचवर लोक आणि पर्यटक गर्दी लागले होते. यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. म्हणजेच लोक समुद्रात चालताना दिसत असल्याचे म्हटले जाते ते मुळात पुरामुळे तयार झालेल्या सँडबारवर चालत आहेत.

मूळ बातमी येथे वाचा – न्यूज मिनिटमनोरमा

मातृभूमी न्यूज या चॅनेलने यावर केल्या बातमीचा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता. पोन्नानी बीचवरील सँडबार पाहण्यासाठी लोकांनी किती गर्दी केली होती हे यामध्ये दाखवण्यात आले आहे.

निष्कर्ष

तमिळनाडूच्या धनुषकोडी येथील हिंदी महासागरातील रामसेतू म्हणून पसरविला जाणार व्हिडियो मूळात केरळमधील पोन्नानी बीचवरील आहे. छायाचित्रकार अभिलाष विश्वा यांनी ऑगस्ट 2018 मध्ये हा व्हिडियो चित्रित केला होता. केरळमधील महापुरामुळे पोन्नानी बीचवरील समद्रात असा सँडबार तयार झाला होता. हा त्याचा व्हिडियो आहे. तो रामसेतूचा नाही.

Avatar

Title:केरळमधील किनारपट्टीचा व्हिडियो तमिळनाडू येथील रामसेतू म्हणून व्हायरल. पाहा सत्य काय आहे

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False