विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुढारी-एबीपी माझाचे जुने सर्वेक्षण केले जातेय शेयर. वाचा सत्य

Mixture राजकीय

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकते. दिवाळीच्या आत राज्यातील निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच आचारसंहिता लागू होऊन, रणकंदन सुरू होईल. आपल्या पक्षाची वातावरण निर्मिती करण्यासाठी सगळ्याच पक्षांनी सोशल मीडियाचा जोरदार वापर सुरू केलेला आहे. वृत्तवाहिन्यासुद्धा गावोगावी जाऊन जनतेचा कौल जाणून घेत आहेत. 

अशाच एक जनमत चाचणीमध्ये विद्यमान भाजप-शिवसेनेच्या सरकारवर राज्यातील 61 टक्के जनता नाराज असल्याचे समोर आले. पुढारी-एबीपी माझाने केलेल्या या सर्वेक्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

काय आहे या पोस्टमध्ये?

16 सप्टेंबर रोजी शेयर करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये पुढारी व एबीपी माझा वाहिनीने केलेल्या “कौल मराठी मनाचा” सर्वेक्षणाचा फोटो दिला आहे. यामध्ये राज्यातल्या भाजप-सेने सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का, या प्रश्नावर 61 टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले तर, 39 टक्के लोकांनी समाधानी असल्याचे उत्तर दिले.

तथ्य पडताळणी

सदरील सर्वेक्षणाची सत्यता तपासण्यासाठी पोस्टमधील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. तेव्हा कळाले की हे सर्वेक्षण दीड वर्षांपूर्वीचे आहे. केंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुढारी आणि एबीपी माझाने मे महिन्यात हे सर्वेक्षण प्रसिद्ध केले होते. एबीपी माझाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून 4 मे 2018 रोजी पोस्टमध्ये दिलेला स्क्रीनशॉट शेयर करण्यात आला होता.

अर्काइव्ह

फडणवीस सरकारची कामगिरी कशी सुरु आहे, जनतेचा कल कुठे आहे, सरकारची धोरणं, निर्णय, योजना इ. जनतेला पसंत पडत आहेत का, इत्यादी अनेक प्रश्नी पुढारी वृत्तपत्र आणि एबीपी माझाने गेल्या वर्षी जनतेचा कौल जाणून घेतला होता. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष 4 मे 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. तेव्हाच्या जनमतानुसार, 37 टक्के लोकांनी सरकारची कामगीरी सुमार असल्याचे सांगितले होते तर, 27 टक्के लोकांना सरकार उत्तम कामगिरी करीत असल्याचे म्हटले होते. एकुण निष्कर्षाअंती जनता भाजप-सेना सरकारवर असमाधानी असल्याचे दिसून आले होते.

संपूर्ण सर्वेक्षण येथे वाचा – एबीपी माझाअर्काइव्ह

या सर्वेक्षणाचे निकाल आल्यावर एबीपी माझा वाहिनीवर सर्वपक्षांचे प्रतिनिधी बोलवून चर्चादेखील करण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे नवाब मलिक, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, काँग्रेसचे भाई जगताप आदींनी सहभाग घेतला होता. ही चर्चा तुम्ही खाली पाहू शकता. किंवा एबीपी माझाच्या अधिकृत वेबसाईटवरसुद्धा पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, 61 टक्के जनता भाजप-सेनेच्या सरकारवर असमाधानी असलेला हा सर्वे सुमारे दीड वर्षे जुना आहे. पुढारी आणि एबीपी माझा वाहिनीने मे 2018 मध्ये मराठी मनाचा कौल हे सर्वेक्षण घेतले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भ्रामक पद्धतीने ही पोस्ट फिरवली जात आहे.

Avatar

Title:विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुढारी-एबीपी माझाचे जुने सर्वेक्षण केले जातेय शेयर. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Mixture