
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे. लोकसभेनंतर आता राज्यात कशी राजकीय परिस्थिती असेल यावर चर्चा आणि अंदाज बांधणी सुरू आहे. पक्षीय बलाबल आणि जागांचे गणित जुळवण्याची तयारी सुरू आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले जात आहेत. कारण आचारसंहिता लागू झाल्यावर अनेक बंधन येतात.
राजकीय पक्षांसोबतच मतदारांनासुद्धा निवडणुकीचे वेळापत्रक कसे असेल याची उत्सुकता लागली आहे. काहींनी तर विधानसभेचे वेळापत्रक जाहीर झाल्याच्या पोस्टसुद्धा शेयर केल्या आहेत. त्यानुसार दावा केला जात आहे की, महाराष्ट्र विधानसभा जाहीर झाल्या असून, 20 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । फेसबुक । फेसबुक
काय आहे पोस्टमध्ये?
गेल्या काही दिवसांपासून फेसबुक आणि व्हॉटस्अॅपवर पुढीलप्रमाणे मेसेज फिरत आहे,
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर
20 – सप्टेंबर 2019 अचारसंहिता लागू
27 – सप्टेंबर 2019 फॉर्म भरणे
15 – ऑक्टोंबर 2019 मतदान
19 – ऑक्टोंबर 2019 मतमोजणी
तथ्य पडताळणी
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणे ही मोठी बातमी आहे. सगळ्या मीडियामध्ये ती बातमी येईल. निवडणूक आयोगातर्फे पत्रकार परिषद घेऊन अधिकृतरीत्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो. परंतु, गुगलवर शोध घेतल्यावर अशा प्रकारची कोणतीही बातमी आढळून येत नाही. केवळ अचारसंहिता केव्हा लागू होईल याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया टुडे
इंडिया टुडेच्या 16 सप्टेंबरच्या बातमीनुसार, महाराष्ट्र विधानसभेचे वेळापत्रक 19 सप्टेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. सकाळच्या बातमीनुसार, 20 सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागू होण्याचा अंदाज आहे. दिवाळीच्या आधी निवडणुका आटोपणार असल्याचे बोलले जात आहे.
अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने निवडणूक आयोगाशी संपर्क केला. उपजिल्हाधिकार (निवडणूक) पांडुरंग कुलकर्णी यांनी माहिती दिली की, आज 18 सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत आयोगाने आचारसंहिता किंवा निडवणूक कार्यक्रम जाहीर केलेला नाही. तशी कोणतीही अधिकृत घोषण करण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकांनी अशी खोटी माहिती पसरवू नये.
निष्कर्ष
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) यांनी स्पष्ट केले की, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळी या पोस्ट खोट्या आहेत.

Title:महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे खोटे वेळापत्रक व्हायरल. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
