HEATING FACTS: सौदी अरेबियामध्ये उन्हाचा पार वाढल्याने कारदेखील वितळू लागल्या आहेत का?

False आंतरराष्ट्रीय | International राजकीय | Political

ग्लोबल वार्मिंगमुळे जगभरात तापमान वाढ होत आहे. महाराष्ट्रातसुद्धा यंदा नेहमीपेक्षा जास्तच उन्हाचे चटके बसले. अनेक शहरांत तापमान 47-48 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले. अशा या वाढलेल्या तापमानासंबंधी एक पोस्ट व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर कारचा मागचा भाग वितळलेला एक फोटो मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. हा फोटो सौदी अरेबियातील रियाध शहरात असल्याचे म्हटले जाते. तेथे पारा 62 डिग्रीवर पोहचला असून, तापमानातील भरमसाठ वाढीमुळे कारदेखील वितळत असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची तथ्य पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमधील फोटोत उन्हामध्ये उभ्या असलेल्या दोन कार आहेत. कारचा मागचा भाग वितळून जमिनीवर गोळा होऊन कारचे नुकसान झाल्याचे दिसते. सोबत लिहिले की, सौदी अरब येथील रियाध जवळील भागात तापमान 62 डिग्री झाले आहे.

तथ्य पडताळणी

पोस्टमधील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर हा फोटो गेल्यावर्षीपासून विविध दाव्यासह सोशल मीडियावर फिरत असल्याचे समोर आले. फॅक्ट ऑर फिक्शन या ब्लॉगमध्ये कोल्ड न्यूज 13 वेबसाईटचा दाखला देऊन हा फोटो अमेरिकेतील अ‍ॅरिझोनातील टक्सन शहरातील असल्याचे म्हटले आहे. सदरील वेबसाईटवरील बातमीनुसार, टक्सन शहरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीला 19 जून 2018 रोजी पहाटे दोन वाजता भीषण आग लागली होती. आगीची तीव्रता इतकी होती की, आसपासच्या इमारती व वाहनांना याची झळ बसली.

येथील युनिव्हर्सिटी व्हिस्टा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या डॅनी नावाच्या विद्यार्थ्याने सांगितले की, त्याच्या कारचा मागचा भाग उष्णतेमुळे वितळला.

मूळ बातमी येथे वाचा – कोल्ड न्यूज 13अर्काइव्ह

स्थानिक वेबसाईटवरील वृत्तानुसार, टक्सन शहरातील द मार्क नावाच्या एका खासगी वसतिगृहाच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला रात्री उशीरा आग लागली होती. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी सुमारे 10 मिलियन डॉलर्सचे नुकसान झाले होते. आगीचे कारण सांगणाऱ्याला दहा हजार डॉलर्सचे बक्षीसदेखील जाहीर करण्यात आले होते. आगीत बांधकामावरील क्रेनदेखील वितळून गेली होती. टक्सन अग्निशमन दलाच्या अधिकृत ट्विटर आणि फेसुबक अकाउंटवरून या आगीचा व्हिडियो शेयर करण्यात आला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता.

https://twitter.com/TucsonFirePIO/status/1009097664170901504

अर्काइव्ह

कोल्ड न्यूज 13 या वेबसाईटवरील यासंबंधीच्या बातमीत वितळलेल्या कारचा फोटो दिलेला आहे. त्याची आणि पोस्टमधील फोटोची तुलना केल्यावर दोघांमधील साम्य लक्षात येते. आगीमुळे नुकसान झालेल्या इतर कारचे फोटो तुम्ही या लिंकवर पाहू शकता. टक्सन शहरात राहणाऱ्या नागरिकांनीसुद्धा आगीमुळे झालेल्या नुकसानीचे व्हिडियो/फोटो त्यावेळी फेसबुकवर शेयर केले होते. यामध्येसुद्धा अनेक कारचा मागचा भाग वितळल्याचे स्पष्ट दिसते.

मूळ बातमी येथे वाचा – कोल्ड न्यूज 13अर्काइव्ह

वरील माहितीवरून इतके तर लक्षात येते की, अ‍ॅरिझोनातील टक्सन शहरात एका इमारतीला आग लागल्यामुळे आसपासच्या कारचे नुकसान झाले होते. परंतु, व्हायरल पोस्टमधील मूळ फोटो तेथीलच आहेत याचा पक्का पुरावा काय? कारण वितळलेला दोन कारचा फोटो कोणत्याही बातमीत नाही, तसेच कोणी सर्वप्रथम शेयर केला याचीदेखील माहिती उपलब्ध नाही.

व्हायरल पोस्टमधील फोटोची हाय रेझ्युलेशन इमेज इंटरनेटवर उपलब्ध आहे. या फोटोचे नीट निरीक्षण केल्यावर मागच्या भिंतीवर एक पाटी दिसते. झूम करून पाहिल्यावर 624-0619 हा क्रमांक दिसतो. हा धागा पकडून गुगलवर शोध घेतला.

गुगलवर Tucson Arizona 6240619 असे सर्च केल्यावर टक्सन शहरातील युनिव्हर्सिटी व्हिस्टा अपार्टमेंट्सचा पत्ता समोर येतो. कोल्ड न्यूज 13 मध्ये याच अपार्टमधील डॅनी नावाच्या विद्यार्थ्याने कार वितळल्याचे सांगितले होते. तसेच टक्सन शहरातील ई-10 स्ट्रीट व एन-टिंडॉल अव्हेन्यूव्ह रस्त्यावरील द मार्क कॉम्प्लेक्सला 19 जून 2019 रोजी आग लागली होती. गुगल मॅपवर दोन्ही पत्ते तपासले असता कळते की, जेथे आग लागली होती. त्या इमारतीच्या समोरच युनिव्हर्सिटी व्हिस्टा अपार्टमेंट्स आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, सदरील फोटो अमेरिकेतील टक्सन शहरातील असून, तो सौदी अरेबियातील नाही.

मूळ नकाशा येथे पाहा – गुगल मॅप

मग सौदी अरेबियामध्ये 62 डिग्री तापमान आहे का?

सौदी अरेबियामध्ये आतापर्यंत सर्वाधिक तापमान जेद्दाह शहरात नोंदविले गेलेले आहे. तेथे 23 जून 2010 रोजी 52 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. जगामध्ये आतापर्यंत सर्वाधिक तापमानाचा विक्रम अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीच्या नावे आहे. तेथे 10 जुलै 1913 रोजी 56.7 डिग्री सेल्सियस तापमान झाले होते. म्हणजे जगात आतापर्यंत कुठेच 62 डिग्री सेल्सियस तापमान झालेले नाही.

कार वितळण्यासाठी किती तापमान लागेल?

समजा 62 डिग्री सेल्सियस तापमान झाले तर, एवढ्या उष्णतेने कारची बॉडी वितळू शकते का?. कार बंपर (मागचा भाग, ट्रंकचा दरवाजा) शक्यतो Polypropylene या थर्मोप्लास्टिक पॉलिमरपासून तयार केले जातो. पॉलिप्रोपायलिनचा मेल्टिंग पॉइंट (उत्कलन बिंदू) 179 डिग्री सेल्सियस आहे. म्हणजे 62 अंश से. तापमान झाले तरी कार वितळणार नाही.

निष्कर्ष

पोस्टमधील फोटो सौदी अरेबियातील नसून, अमेरिकेच्या अ‍ॅरिझोनातील टक्सन शहरातील आहे. तसेच तापमानात वाढ झाली म्हणून या कारचा मागचा भाग वितळला नव्हता. इमारतीला लागलेल्या भीषण आगीमुळे हा प्रकार घडला होता. त्यामुळे पोस्टमधील दावा खोटा आहे.

Avatar

Title:HEATING FACTS: सौदी अरेबियामध्ये उन्हाचा पार वाढल्याने कारदेखील वितळू लागल्या आहेत का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False