
कोरोनामुळे रोजगार बुडालेले लाखो मजूर आपापल्या राज्यात परतत आहेत. अशाच काही स्थलांरित मजुरांची राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये भेट घेतली होती. फुटपाथवर बसून त्यांनी मजुरांशी संवाद साधत त्यांची व्यथा जाणून घेतल्या.
सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, राहुल यांनी मजुर म्हणून ज्यांची भेट घेतली ते काँग्रेसचेच कार्यकर्ते होते. त्यांना मजुरांच्या वेशात बसवून गांधी यांनी भेटीचा हा बनाव केला. पुरावा म्हणून त्या “मजुरांचा” चारचाकी गाडीत बसल्याचा फोटो शेयर केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे समोर आले.
काय आहे पोस्टमध्ये?
पोस्ट दोन फोटो दिलेले आहेत. एका फोटोत राहुल गांधी यांच्यासमोर बसलेले दोन मजुर दुसऱ्या फोटोत चारचाकी गाडीमध्ये बसलेले दिसतात. सोबत म्हटले की, काँग्रेस पक्षाचेच काही कार्यकर्ते मजुरांचा मेकअप आणि वेशभुषा करून एसी वाहनांनी इच्छित स्थळी आले होते. मीडियालाही तेथे बोलून घेतले. मग राहुल गांधी आले आणि या बनावट मजुरांशी चर्चा करून त्यांचे दुःख जाणून घेतल्याचे नाटक केले.
मग खरं काय आहे?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
राहुल गांधी यांनी 16 मे रोजी दिल्लीतील सुखदेव विहार उड्डाणपुलापाशी काही स्थलांतरित मजुरांशी गाडीतून उतरून भेट घेतली होती. हे मजुर हरियाणातून आले होते आणि पुढे आपापल्या राज्यांत पायी चालत जात होते. राहुल गांधी यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मजुरांसाठी घरी जाण्याकरिता वाहनांची व्यवस्था केली होती.
ANI वृत्तसंस्थेने ट्विट केलेल्या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, हे मजूर गाडीमध्ये बसलेले आहेत. आजतक वाहिनीवरील व्हिडियोमध्ये स्पष्ट दिसते की, राहुल गांधी यांनी या मजुरांना त्यांच्या त्यांच्या घरी सोडण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती. हे सर्व मजूर या वाहनांमध्ये बसून घरी गेले होते.
खाली दिलेल्या व्हिडियोच्या 1.15 मिनिटापासून आपण पाहू शकतो की, हे मजुर गाडीमध्ये बसत आहेत. म्हणजे गाडीत बसलेल्या त्या मजुरांचा फोटो मुळात राहुल गांधी यांनी मजुरांना घरी परतण्यासाठी व्यवस्था केलेल्या वाहनातील आहे.
काँग्रेस पक्षाच्या युट्यूब अकाउंटवर राहुल गांधी यांच्य भेटीचा संपूर्ण व्हिडियो उपलब्ध आहे. यामध्ये हे मजुर राहुल गांधी यांना झांसी येथे जाणार असल्याचे सांगतात. त्यानुसार काँग्रेसतर्फे या मजुरांना घेऊन जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली. व्हिडियोच्या 14.20 मिनिटांपासून पाहिले तर या मजुरांना झांसी येथे घरी सोडल्याल्यानंतर त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत.
राहुल गांधी यांनी भेट घेतल्यानंतर या मजुरांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आले होते. यावर खुलासा करीत दिल्ली पोलिसांनी म्हटले होते की, आम्ही या मजुरांना ताब्यात घेतलेले नाही. ते अद्यापही त्याच जागेवर आहेत. फक्त एका गाडीत जास्त गर्दी नको म्हणून त्यांना रोखण्यात आले होते. त्यानंतर एका वाहनातून फक्त दोघांनाच पाठवण्यात आले. म्हणजे हे बनावट मजुर नव्हते.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, गाडीत मजुर बसलेल्या फोटोचा चुकीचा अर्थ काढून ते बनावट असल्याचा होत असलेला दावा खोटा आहे. राहुल गांधी यांनी मजुरांना घरी जाण्यासाठी व्यवस्था केलेल्या गाडीतील हे फोटो आहेत.

Title:राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाच मजुर बनवून भेटीचा बनाव केला का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
